मुंबई : भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रूग्ण हा 30 जानेवारी रोजी केरळमधील थ्रिशूर येथे सापडला. महत्वाची बातमी म्हणजे चीनमधील वुहान येथून आलेल्या या पहिल्या रूग्णाला 20 फेब्रुवारी रोजी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 1 मार्चपर्यंत आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या हा रूग्ण आता एकदम ठणठणीत झाला आहे. कोरोनाशी दोन हात केलेल्या या 20 वर्षीय तरूणीने तिचा अनुभव व्यक्त केला आहे.  


कोरोनातून ठणठणीत झालेल्या पहिल्या रूग्णाची गोष्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझ्यामध्ये जेव्हा कोरोना व्हायरस आढळल्याचे स्पष्ट झाले तेव्हा मी घाबरले नाही. उलट मी खूप सतर्क झाले. पण माझे पालक थोडे घाबरले होते. मात्र या सगळ्यात मी मला सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी आवर्जून करत होते जे मला कोरोनाशी दोन हात करायला मदत करत होत्या, ही माहिती केरळातील थ्रिशूर इथे राहणाऱ्या 20 वर्षीय मेडिकल विद्यार्थीनीने दिली आहे.' चीनमधील वुहानहून परतल्यावर अगदी एका आठवड्यात या तरूणीला कोरोनाची लागण झाली. 


मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी ही तरूणी 24 जानेवारी रोजी कोचीला पोहोचली. कोचीला पोहोचल्यावर तिला आरोग्य अधिकाऱ्यांकडून काही फॉर्म भरायला सांगितले. मेडिकल विद्यार्थी असल्यामुळे तिला दिलेल्या सर्व गाईडलाईन फॉलो केल्या आणि योग्य ती माहिती त्यांना पुरवल्याचं तरूणी सांगते. 


तरूणीचा धाडसी निर्णय 


सावधगिरी म्हणून तरूणीने कोरोनाची चाचणी करण्यापूर्वीच एक धाडसी निर्णय घेतला. घरी पोहोचण्याअगोदरच तिने आपल्या गरोदर वहिनीला दुसरीकडे राहण्याचा सल्ला दिला. यासाठी तिला तिच्या वहिनीशी आणि कुटुंबियांशी थोडं भांडाव देखील लागलं पण तिने ते केलं. 25 जानेवारी रोजी जिल्हा अधिकाऱ्यांना तिने आपण केरळमध्ये पोहोचल्याची माहिती दिली. सुरूवातीपासूनच घरी पोहोचल्यावर  तरूणी योग्य ती काळजी घेत होती. जसं की घरात एकटं राहणं. सतत तोडांवर मास्क घालणं, या सगळ्या गोष्टी ती तंतोतंत पाळत होती. मात्र 27 जानेवारी रोजी तिला घशाचा त्रास जाणवू लागला. 


'चीनमधून परत आल्यावर मला सर्दी, खोकला आणि ताप असा त्रास जाणवू लागला. त्यावेळी माझ्या कुटुंबियांनी मला वाफ घेण्याचा तसेच सामान्य औषधे घेण्याचा सल्ला दिला. मात्र मी हट्ट करू डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. मला हे जाणून घ्यायचं होतं की, ही लक्षणे कोरोनाची आहेत की नाहीत? मी माझ्या पालकांसाठी आणि कुटुंबियांसाठी जास्त दक्ष होते. कोणत्याही आजाराची योग्य ती माहिती न घेता मला घरी राहायचं नव्हतं,' असं 20 वर्षीय तरूणी सांगते. 


आरोग्य विभागाला तिला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं तेव्हा त्यांनी तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यावेळी तेथे आणखी चार रूग्ण दाखल असल्याचं समजलं. ज्यांच्या चाचणी करता रक्त तपासणी, लघवी तपसाणीसारख्या आवश्यक त्या तपासण्या केल्या होत्या. 30 जानेवारी रोजी तरूणीला कोरोनाची लागण झाल्याचं निश्चित झाल्यावर तिला थ्रिशूरच्या मेडिकल कॉलेज रूग्णालयातील आयसोलेशन विभागात भर्ती करून घेण्यात आलं. 


कसे होते उपाचाराचे 'ते' 20 दिवस


'20 दिवस मला उपचाराकरता देखरेखी खाली ठेवण्यात आलं होतं. कधी कधी मला खूप असह्य होत असे. पहिल्या दोन आठवड्यात मला काहीच बदल जाणवला नाही. दररोज तेथील परिचारिका माझे कपडे घेऊन जाळत असतं. ज्यामुळे कोरोनाचे विषाणू पसरणार नाही. मला सूचना देण्यात आली होती की, जो फोन मी चीनमध्ये वापरला तो स्वच्छ करावा. इतर कोणताही त्रास होत नसल्यामुळे मला डॉक्टरांनी माझ्या आवडीचं जेवण जेवण्याची परवानगी दिली होती.' 


'त्यावेळी आयसोलेशन विभागात असूनही मी ते सर्व कठोर नियम पाळत होते. इतर रूग्णांच्या तपासणीचा अहवाल अवघ्या दोन आठवड्यात येत होता. पण माझा अहवाल मात्र येत नव्हता. यामुळे मी थोडी नाराज झाले. तेव्हा मला तेथील डॉक्टरांनी श्वसनाचे काही योग्य प्रकार सांगितले. जे मला उत्साही राहण्यास मदत करतील.' 


20 वर्षीय या तरूणीला 20 फेब्रुवारी रोजी रूग्णालयातून घरी पाठवण्यात आलं पण 1 मार्चपर्यंत तिला घरी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला. COVID 19 म्हणजे कोरोनाची सध्यस्थिती पाहता तरूणीने सगळ्यांना योग्य ते प्रोटोकॉल पाळण्याची विनंती केली आहे. 


ठणठणीत झालेल्या 'या' रूग्णाने काय दिला सल्ला 


तुम्हाला कोरोनाची लागण झाल्याची शंका जरी आल्यास लवकरात लवकर तुम्ही आरोग्य विभागाला योग्य ती माहिती द्या. तुम्हाला योग्य वेळेत आवश्यक अशी उपचार व्यवस्था तेथे उपलब्ध होईल. एवढंच नव्हे तर हा साथीचा रोग पसरू नये म्हणून पुरेशी खबरदारी देखील घेतली जाईल.