भारतात `सुपर रिच` होण्यासाठी नेमके किती पैसे लागतात?
एका रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : सुपर रिच, अति श्रीमंत किंवा रईस असण्याची परिभाषा काय आहे? कोणला अति श्रीमंत म्हणायचं? अति श्रीमंत या वर्गात नेमकं कोण येतं? आपण अनेकदा देशात काही लोक अतिशय श्रीमंत आणि अधिक लोक अतिशय गरीब असल्याचं बोललं जातं. 'सुपर रिच' होण्यासाठी एका व्यक्तीकडे नेमक्या किती पैशांची गरज आहे? याबाबत एका रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे.
'सुपर रिच'बाबत पहिल्यांदाच खुलासा -
एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या रिपोर्टनुसार, भारतात वर्षाला ७७ हजार डॉलर म्हणजेच जवळपास ५५ लाख रुपये कमावणारा व्यक्ती 'सुपर रिच' वर्गात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, इतकं कमावणारे केवळ एक टक्के लोक, देशातील सर्वात पॉवरफूल लोक आहेत. दरम्यान, कोणत्याही देशाच्या उत्पन्नाच्या आणि लोकसंख्येच्या आधारे एक टक्के 'सुपर रिच' निश्चित केले जातात.
रिपोर्टनुसार, एक टक्के 'सुपर रिच' होण्यासाठी वर्षाची कमाई अमेरिकेमध्ये ४.८८ लाख डॉलर, चीनमध्ये १.०७ लाख डॉलर आणि ब्रिटनमध्ये २.४८ लाख डॉलर इतकी होण्याची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं आहे.
संपूर्ण देशात एक टक्के 'सुपर रिच' -
रिपोर्टनुसार, कोणत्याही देशात सरासरी एक टक्के लोकचं 'सुपर रिच' या वर्गात येतात. देशातील एकूण कमाईचा सर्वात अधिक हिस्सा याच एक टक्के लोकांकडे असतो. देशातील विविध धोरणांपासून प्रत्येक महत्वाच्या विषयावर हे लोक परिणाम करू शकतात. नुकतंच एका स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आलेल्या शोधात, अनेक देशांत श्रीमंत आणि गरीब या दोघांमधील अंतर, आधीच्या तुलनेत आता मोठ्या पटीने वाढलं असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब आधीपेक्षा अधिक गरीब होत असल्याचं बोललं जात आहे.