पंतप्रधान मोदींचे विश्वासू अजित डोवाल, घेतात एवढा पगार
दहशतवाद्यांचा खात्मा करणं असो किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक.
नवी दिल्ली : दहशतवाद्यांचा खात्मा करणं असो किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक. महत्त्वाच्या निर्णयांवेळी रणनिती ठरवणाऱ्यांमधलं एक नाव म्हणजे अजित डोवाल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका अजित डोवाल अगदी चोख पार पाडत आहेत.
मोदी सरकारच्या रणनिती यशस्वी करणाऱ्या अजित डोवाल यांच्याबरोबरच पंतप्रधानांच्या अन्य सहकाऱ्यांच्या पगाराची माहिती समोर आली आहे. खुद्द पंतप्रधान कार्यालयानंच ही माहिती सार्वजनिक केली आहे.
डोवाल यांना सर्वाधिक पगार नाही
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी नाहीत. अजित डोवाल यांना महिन्याला १,६२,५०० रुपये पगार मिळतो. पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, अतिरिक्त प्रधान सचिव पी.के.मिश्रा यांनाही डोवाल यांच्याएवढाच पगार मिळतो. हे तिघंही निवृत्त अधिकारी आहेत.
भास्कर खुल्बेंना सर्वाधिक पगार
१९८३च्या बॅचचे आयएएस अधिकारी भास्कर खुल्बे पंतप्रधान कार्यालयातले सर्वाधिक पगार असणारे अधिकारी आहेत. खुल्बे यांना महिन्याला २.०१ लाख रुपये पगार मिळतो.
इतर अधिकाऱ्यांचा पगार किती?
पंतप्रधान कार्यालयातल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना महिन्याला ९९,४३४ रुपये पगार मिळतो. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जुने सहकारी जे.एम.ठक्कर यांनाही ९९,४३४ रुपयांची पेन्शन मिळते. पंतप्रधान कार्यालयातल्या पोस्टेड इन्फॉर्मेशन ऑफिसर शरत चंदर यांना महिन्याला १.२६ लाख रुपये पगार मिळतो.
संयुक्त सचिव तरुण बजाज यांना १,७७,७५०, अनुराग जैन यांना १,७६,२५० आणि ए.के.शर्मांना १,७३,२५० रुपये एवढा पगार मिळतो. ऑगस्ट २०१६ सालची ही आकडेवारी आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही पंतप्रधान कार्यालयानं अधिकाऱ्यांचा पगार सार्वजनिक केला होता.