नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये नोटाबंदी केल्यानंतर २०० आणि २००० रुपयांचे नवे चलन अस्तित्त्वात आणले. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांत १०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नव्या आकारातील आणि डिझाईनमधील नोटा चलनात आणण्यात आल्या. सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. आता अशीही माहिती मिळते आहे की रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्याही नव्या नोटा चलनात आणणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन वर्षांत जवळपास सगळ्याच नव्या नोटा चलनात आल्या आहेत. या काळात तुम्हाला एखादी फाटलेली नोटही मिळालेली असू शकते किंवा तुमच्याकडूनही एखादी नोट फाटली जाऊ शकते. मग अशावेळी काय करायचे, असा प्रश्न तुमच्यापुढे असेल. तर आता काळजी करण्याचे कारण नाही. रिझर्व्ह बॅंकेने फाटलेल्या जुन्या नोटा बदलून देण्यास मंजुरी दिली आहे. तुमच्याकडील नोट किती फाटली आहे. त्यावर त्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला किती रक्कम मिळणार हे अवलंबून आहे.


रुपये १० - दहा रुपयांच्या नव्या नोटेचा आकार ७७.४९ चौरस सेंटीमीटर आहे. जर ही नोट बदलून तुम्हाला पूर्ण रक्कम हवी असेल, तर त्या नोटेचा किमान ३९ चौरस सेंटीमीटर इतका भाग तुम्ही बॅंकेकडे परत केला पाहिजे.


रुपये ५० - ५० रुपयांच्या नव्या नोटेचा आकार ८९.१० चौरस सेंटीमीटर आहे. जर ही नोट बदलून तुम्हाला पूर्ण रक्कम हवी असेल, तर त्या नोटेचा किमान ७२ चौरस सेंटीमीटर इतका भाग तुम्हाला बॅंकेकडे द्यावा लागेल. जर तुम्ही ३६ चौरस सेंटीमीटर इतकाच तुकडा परत केला तर तुम्हाला निम्मीच रक्कम मिळेल आणि त्यापेक्षा कमी भागाचा तुकडा परत केला तर मात्र काहीही मिळणार नाही


रुपये १०० - १०० रुपयांच्या नव्या नोटेचा आकार ९३.७२ चौरस सेंटीमीटर इतका आहे. जर अशी फाटलेली नोट तुम्हाला परत करून पूर्ण रक्कम हवी असेल, तर या नोटेचा किमान ७५ चौरस सेंटीमीटर इतका भाग परत करावा लागेल. जर तुमच्याकडे नोटेचा ३८ चौरस सेंटीमीटरचा तुकडाच असेल, तर तुम्हाला निम्मीच रक्कम मिळेल.


रुपये ५०० - ५०० रुपयांच्या नव्या नोटेचा आकार ९९ चौरस सेंटीमीटर आहे. जर अशी फाटलेली नोट तुम्हाला परत करून पूर्ण रक्कम हवी असेल, तर या नोटेचा किमान ८० चौरस सेंटीमीटर इतका भाग तुमच्याकडे असायला हवा. जर तुमच्याकडे ४० चौरस सेंटीमीटरचा तुकडा असेल, तर तुम्हाला निम्मीच रक्कम मिळेल. 


रुपये २००० - २००० रुपयांच्या नव्या नोटेचा आकार १०९.५६ चौरस सेंटीमीटर आहे. जर तुमच्याकडे ८८ चौरस सेंटीमीटरचा तुकडा असेल, तर तुम्हाला या नोटेची पूर्ण रक्कम मिळू शकते. तर ४४ चौरस सेंटीमीटरचा तुकडा असेल तर निम्मीच रक्कम मिळू शकते.