मुंबई : जगभरातील समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या देशांचा समूह, तेथे निर्माण झालेल्या वादळांना नावं देत असतात. या नावांची यादी जिनेव्हाला जागतिक हवामान खात्याच्या कार्यालयाला पाठवली जातात. तेथूनच वादळाला नावं ठेवली जातात. चक्रीवादळाला नाव देण्याची सुरूवात अमेरिकेने १९५३ साली पहिल्यांदा केली. १९७८ पर्यंत चक्रीवादळास फक्त स्त्रीलिंगी नाव देण्यात येत होते. मात्र महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्रीवादळ हा शब्द पु्ल्लिंगी असताना, फक्त स्त्रीलिंगी नाव कशासाठी असा आक्षेप घेतल्यानंतर, १९७८ पासून पुल्लिंगी नावही दिले जाऊ लागले. भारतीय उपखंडात २००० पासून चक्रीवादळांना नावं देण्यास सुरूवात झाली.


यात अर्थातच भारत तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, मालदीव, श्रीलंका, ओमान, आणि थायलँडचा देखील समावेश आहे. यात सदस्य देशांनी प्रत्येकी ८ नावं सुचवली आहेत. ही एकूण ६४ नावांची यादी आहे. ही यादी जागतिक हवामान खात्याला सोपवण्यात आली. 


या यादीतूनच भारतीय उपखंडातील वादळांना नावं निवडली जातात. वादळ निर्माण झाल्यानंतर, या यादीतील क्रमांकाप्रमाणे ही नावं निवडली जातात. बांगलादेशने सुचवलेल्या यादीतील 'फनी' या वादळाचा उच्चार 'फोनी' असा आहे. 


भारताने याआधी वादळाला अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर आणि वायू हे नाव दिले होते. तसेच पाकिस्तानने फानूस, लैला, नीलम, वरदहा, तितली आणि बुलबुल असे नाव दिले होते. याच यादीच्या आधारावर ओडिशा येथील वादळाला 'फनी' हे नाव देण्यात आले. 


याच भागातील एका वादळाला गेल्या वर्षी 'तितली' नाव दिले गेले होते. नोव्हेबंर महिन्यात दक्षिण तमिळनाडू येथील वादळाला 'ओखी' नाव दिले होते. ते नाव देखील बांग्लादेशकडून सुचवलं गेलं होतं.