अवघ्या १० मिनिटांत `या` एक्स्प्रेस गाडीतील थर्ड एसी क्लासची सर्व तिकीटं आरक्षित
तिकिटाचे दर इतके चढे असूनही प्रवाशांची झुंबड उडताना दिसत आहे.
नवी दिल्ली: तब्बल दीड महिन्यानंतर सुरु होत असलेल्या रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारने १२ मे पासून टप्याटप्प्याने रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज सहा वाजल्यापासून तिकीटांच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली. ऑनलाईन बुकिंग सुरु झाल्यानंतर हावडा - दिल्ली या एक्स्प्रेस गाडीतील फर्स्ट एसी आणि थर्ड एसी क्लासमधील सर्व तिकीटे अवघ्या १० मिनिटांत विकली गेल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.
रेल्वेचे संकेतस्थळ क्रॅश;ऑनलाईन बुकिंगचे तीनतेरा
पहिल्या टप्प्यात नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलसह देशभरातील १५ राजधानी मार्गावर ३० फेऱ्या धावणार आहेत. या सर्व गाड्या पूर्णपणे वातानुकूलित राहणार असून संपूर्ण प्रवासी क्षमतेसह (एका डब्यात ७२ प्रवासी) धावणार आहेत. या गाड्यांच्या तिकीटदरात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. तिकिटाचे दर इतके चढे असूनही प्रवाशांची झुंबड उडताना दिसत आहे.
भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठीच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल
तसेच रेल्वे तिकीटाच्या रक्कमेत खानपान (कॅटरिंग) शुल्काचा समावेश नसेल.कॅटरिंगमधील तयार जेवणाचा पर्याय रेल्वेकडून बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी IRCTC कडून मोजक्या खाद्यपदार्थ्यांची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. मात्र, त्यासाठी प्रवाशांना वेगळे पैसे भरावे लागतील. शक्यतो प्रवाशांनी स्वत:च्या घरुनच खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी आणावे, असे रेल्वेने म्हटले आहे.