भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठीच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल

प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे की... 

Updated: May 11, 2020, 05:02 PM IST
भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठीच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : Corornavirus कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाची एकंदर पार्श्वभूमी पाहता सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे बंद असणारी रेल्वे वाहतूक आता खास सुविधेअंतर्गत टप्प्याटप्पाने सुरु होणार आहे. ज्यासाठी आता प्रवाशांना अनुसरुन काही महत्त्वाची नियमावली जारी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे तिकीट कन्फर्म असेल तरच रेल्वे प्रवास करा, असंही प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. 

रेल्वे प्रवासाठी देण्यात आलेल्या काही अटींमध्येच कन्फर्म ई तिकीट असणं अनिवार्य असेल. त्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय प्रवासाची सुरुवात करतेवेळी आणि प्रवासादरम्यानही सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन गेलं जाण्याची अट नमूद करण्यात आली आहे. निर्धारित स्थानकावर पोहोचल्यानंतर तेथे आरोग्य विभागाच्या आदेशांनुसार सर्व अटीचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असेल.  रेल्वेची कँटीन सेवा बंद असेल. शिवाय नेहमी देण्यात येणाऱ्या सुविधा उदा. ब्लँकेट, चादर, उशी या सुविधा पुरवण्यात येणार नाही. 

वाचा : 'श्रमिक स्पेशल रेल्वे' सुविधेत मोठा बदल 

रेल्वे वाहतूक सुरु होणार.... 

दरम्यान, प्रदीर्घ काळापासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वेकडून आता मोठा निर्णय घेतला गेल्याचं पाहायला मिळत आहे. १२ मे पासून लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे. ज्याअंतर्गत १५ रेल्वे (३० परतीचे प्रवास) पुन्हा सुरु होणार असल्याचं चित्र आहे. 

खास रेल्वे सेवांअंतर्गत या ट्रेन रुळांवर धावणार आहेत. नवी दिल्ली,ला जोडणाऱ्या दिब्रूगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदाबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवअनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू ताबी अशा स्थानकांवरुन या रेल्वे सोडण्यात येतील.