आत्मा म्हणजे शरीरातील वाताचा प्रकार; आयुष मंत्रालयाचा जावईशोध
यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रियेला (मेटाबॉलिक क्रिया) चालना मिळते.
नवी दिल्ली: वैज्ञानिक किंवा वैश्विक सत्य असणाऱ्या गोष्टींसंदर्भात अजब दावे करण्याची भाजप नेत्यांची खोड जुनीच आहे. मग ते केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला दिलेले आव्हान असो किंवा पंतप्रधान मोदी यांनी गणपतीचा दाखला देत पुराणकाळात भारतात प्लॅस्टिक सर्जरीचे तंत्र उपलब्ध असल्याचा दावा असो. आता या ज्ञानात मोदी सरकारच्या आयुष मंत्रालयाने नवी भर घातली आहे. आयुष मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की, माणसाचा आत्मा हा म्हणजे शरीरातील वाताचा (गॅस) प्रकार आहे. वातावरणातील हवेपासून तो तयार होतो. यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रियेला (मेटाबॉलिक क्रिया) चालना मिळते. तसेच शरीरातील सर्व अवयवांच्या चलनासाठी लागणारी उर्जा निर्माण होते, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. साहजिकच आयुष मंत्रालयाच्या या अजब दाव्यामुळे वादाला तोंड फुटले. सोशल मीडियावरील अनेकांनी आयुष मंत्रालयाच्या या दाव्याची खिल्ली उडवली.
यापूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी मानवी उत्क्रांतीचा डार्विनचा सिद्धांत नाकारला होता. अखिल भारतीय वैदिक संमेलनात त्यांनी म्हटले होते आपल्या पूर्वजांपासून ते आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वानरापासून मानवाची निर्मिती झाली, असे कुणीच म्हणालेले नाही. वानरापासून मनुष्याची निर्मिती झाली आहे, असे कोणी पाहिले आहे काय?, किंबहुना तसा दावाही कुणी केलेला नाही. मात्र, आम्हाला शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात डार्विन या शास्त्रज्ञाचा तो सिद्धांत शिकविला जातो. डार्विनचा विज्ञानातील हा सिद्धांत खोटा आणि अत्यंत चुकीचा असल्याचे सत्यपाल सिंह यांनी सांगितले होते.