हाथरस प्रकरण : `...तुझी काळजी वाटते`; प्रियंकांसाठी पतीचं भावनिक ट्विट
विरोध होत असतानाही...
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस hathras येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनं साऱ्या देशात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेला न्याय मिळण्यासोबतच आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण देशातून करण्याचत येत आहे. याच परिस्थितीमध्ये आपल्या मुलीला अखेरच्या क्षणी पाहूनही न दिल्याची खंत पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्यामुळं साऱ्या देशानं हळहळ व्यक्त केली आहे.
एकंदर परिस्थिती आणि उत्तर प्रदेशातील घडामोडी पाहता विरोध होत असतानाही काँग्रेसच्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी अखेर पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी या कुटुंबाला आधार देत त्यांच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठीचा लढा सुरुच राहील अशी हमीही दिल्याचं पाहायला मिळालं.
प्रियंका गांधी या सध्या ज्या परिस्थितीला सामोऱ्या जात आहेत, विरोधकांशी सामना करत आहेत आणि एका मुलीला, तिच्या कुटुंबाला, समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत हे पाहता त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक भवनिक ट्विट केल्याचं पाहायला मिळालं.
पत्नीचा सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी प्रियंका यांच्याप्रती काळजीही व्यक्त केली. 'तुझा अभिमान वाटतोय पी (प्रियंका). देशातील अडचणीत सापडलेल्यांना न्याय देण्याचा हा एकमेव मार्ग आहे. मला आणि आपल्या कुटुंबाला तुझी काळजी वाटते. आपल्या देशातील नागरिकांनाही तुझी चिंता आहे. पण, समाजातील या घटनांसाठी लढण्यासाठी पुढाकारानं सामना करावाच लागणार आहे', असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं.
वाड्रा यांनी प्रियंका यांचे दोन फोटोही सोबत जोडले. ज्यामधील एका फोटोमध्ये त्या हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाचं सांत्वन करताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे विरोधाचा सामना करताना दिसत आहेत. एकाच वेळी अनेक प्रसंगांचा सामना करत या आव्हानात्मक परिस्थितीतही अतिशय धीटपणे उभ्या असणाऱ्या प्रियंका यांच्यासाठी त्यांच्या पतीनं केलेलं हे ट्विट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधत आहे.