मुंबई : तुमचं बँकेत अकाऊंट आहे... आणि या बँकेचं एटीएमकार्डही तुमच्याकडे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यापूर्वी, पैसे काढण्याच्या निमित्तानं एखाद्या घाईच्या वेळी तुम्ही तुमचं कार्ड जवळच्या व्यक्तीच्या हाती सोपवून त्यालाच पैसे काढायला सांगितलं असेल... पण, आता मात्र तुम्हाला हे टाळावं लागणार आहे. तुमचं एटीएम कार्ड हस्तांतरणीय नाही... त्यामुळे इतर लोक त्याचा वापर करू शकत नाहीत, असे निर्देश  न्यायालयानं दिलेत. याची अंमलबजावणी टाळलीत तर त्याचा फटका तुम्हालाच बसू शकतो. 


काय आहे प्रकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबर २०१३ साली बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका गर्भवती महिलेनं स्वत:ला जाता येत नाही म्हणून बँकेतून पैसे काढण्यासाठी आपल्या पतीकडे आपलं एटीएम कार्ड सोपवलं... पती राजेश कुमार यांनी आपल्या घराजवळच्या एटीएममधून २५ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला... यावेळी, काही कारणामुळे पत्नीच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मॅसेज आला मात्र प्रत्यक्षात एटीएममशीनमधून पैसे बाहेर आलेच नाहीत. पती-पत्नीनं याची रितसर तक्रार बँकेत नोंदवली... परंतु, या दाम्पत्याला ना बँकेनं पैसे परत केले... ना ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडून दिलासा मिळाला. 


गर्भवती असल्या कारणानं प्रकृतीच्या कारणामुळे आपणा स्वत:ला एटीएममध्ये जाणं शक्य नव्हतं, असं महिलेचं म्हणणं आहे. पण बँक काही तिचं ऐकण्यास तयार नव्हती. हे प्रकरण ऑक्टोबर २०१४ मध्ये ग्राहक कोर्टात पोहोचल्यानंतर या दाम्पत्याने एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. तसंच माहिती अधिकारांतर्गत एटीएम मशिनमधील पैशांची माहितीही घेतली. त्यावेळी एटीएम मशिनमध्ये त्यादिवशी २५ हजार रुपये जास्त असल्याची माहिती समोर आली... हे सर्व पुरावे कोर्टात सादर करूनही महिलेनं नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगत महिलेनं पतीला डेबिट कार्डऐवजी चेक द्यायला हवा होता, असा सल्ला देत न्यायालयानं या महिलेची याचिका फेटाळून लावली.


नियमांचं उल्लंघन?


तांत्रिक बाबी पाहिल्या तर त्यावेळी असं लक्षात आलं की या घटनेत बँकेच्या नियमांचं उल्लंघन झालं होतं. बँकेच्या नियमांनुसार, एटीएम कार्ड गैरहस्तांतरीय आहे, असं सांगत पैसे परत करण्यास बँकेनं नकार दिलाय. 


बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह


पण, दुसऱ्या बाजुनं पाहिलं तर जरी महिलेनं नियम तोडले असतील तर तिला दंड लावला जाऊ शकतो... परंतु, बँकेनं पैसे देण्यास नकार देऊन आपल्या अनेक ग्राहकांच्या चिंतेत भरच घातलीय. या घटनेमुळे बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.