तेलंगणामध्ये पुन्हा `सैराट`, बापाचा मुलगी-जावयावर कोयत्यानं वार
हैदराबादमध्ये जन्मदात्या बापानं आपली नवविवाहित मुलगी आणि जावयावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीये.
हैदराबाद : हैदराबादमध्ये जन्मदात्या बापानं आपली नवविवाहित मुलगी आणि जावयावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीये. संदीप आणि माधवी यांनी आठवड्याभरापूर्वी लग्न केलं होतं. या दोघांची जात वेगळी असल्यामुळे माधवीच्या वडिलांचा याला विरोध होता. त्यांनी संदीपला फोन करून नवे कपडे घेण्याच्या बहाण्यानं एरागड्डा या भागात बोलावलं. आपल्या दुचाकीवरून दोघं तिथं आले असता माधवीच्या वडिलांनी पाठीमागून येऊन संदीपवर कोयता चालवला. माधवीनं त्यांना विरोध करताच वडिलांनी पोटच्या मुलीवरही कोयत्यानं सपासप वार केले. या हल्ल्यात दोघंही जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं. हल्लेखोर बाप फरार असून त्याचा शोध घेतला जातोय.
तेलंगणामध्ये आठवड्याभरात अशी दुसरी घटना घडलीये. १४ तारखेला नलगोंडा जिल्ह्यात जातीबाहेर लग्न केल्याच्या रागातून एका तरुणावर असाच कोयत्यानं पाठीमागून हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मुळचा बिहारी असलेल्या मारेकऱ्यासह ७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती कालच हैदराबाद पोलिसांनी दिली होती. त्यापाठोपाठ खुद्द राज्याच्या राजधानीत दिवसाढवळ्या असाच प्रकार घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.