हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पुन्हा एकदा निर्भया हत्याकांड घडलंय. २२ वर्षांच्या एका डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलीय. हैराबादच्या सायबराबाद स्टेशन पोलिसांनी चार आरोपींना पकडल्याचा दावा केलाय. यामध्ये दोन गाड्यांचे ड्रायव्हर आणि एका क्लीनरचा समावेश आहे. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलु आणि शिवा अशी या आरोपींची नावं आहेत. या आरोपींनी पीडित महिलेचं अगोदर अपहरण केलं त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला ठार मारलं. सायबराबाद पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केलीय. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेची स्कूटर जाणून-बुजून पंक्चर करण्यात आली. त्यानंतर मदतीची बतावणी करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक वाचा :- रस्त्याशेजारी संशयास्पद आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह


दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडला ७ वर्ष पूर्ण होतायेत. काहीशी तशीच आणखी एक हादरवणारी घटना हैदराबादमध्ये घडलीय. २२ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर रस्त्याच्या कडेलाच तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.



निर्भया हत्येचा घटनाक्रम


रात्रीच्या सुमारास हैदराबाद-बंगळुरू महामार्गावरून ही डॉक्टर तरुणी आपल्या कोल्लूरू गावातल्या घरी परतत होती. रस्त्यात तिची मोटार सायकल पंक्चर झाली. तिथे असलेल्या काही लोकांनी या महिलेला मोटार सायकलचं टायर बदलण्यास सांगितलं. याच बहाण्याने या महिलेला ते सामसूम ठिकाणी घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिची गळा दाबून हत्याही करण्यात आली. पुरावे मिटवण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला.


पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चार आरोपींना अटक केली. महत्त्वाचं म्हणजे घटनेच्या काही वेळापूर्वीच या महिलेने आपल्या बहिणीशी फोनवरून संपर्क साधल्याची माहितीही पुढे आलीय. रात्री ही महिला घरी न पोहोचल्यानं कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन या आरोपींना अटकही केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.