मुलगी मुस्लीम तर मुलगा हिंदू... आईच्या अंत्यसंस्कारावेळी मोठा वाद; रस्त्यावर उतरले लोक
Hyderabad News : हैदराबादमध्ये एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. वेगळा धर्म मानणाऱ्या मुला-मुलीमध्ये झालेल्या वादावादीनंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वादामुळे दोन्ही गटातील लोक घराबाहेर जमा झाले होते
Shocking News : हैदराबादमध्ये (Hyderabad News) एका महिलेच्या अंत्यसंस्कारावरुन (funeral) लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले आहेत. आईच्या मृत्यूनंतर, मंगळवारी हैदराबादच्या मदनपेटमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यावरून हिंदू (Hindu) मुलगा आणि मुस्लिम (Muslim) मुलीमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की घराभोवती लोक जमा होऊ लागले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांना (Hyderabad Police) हस्तक्षेप करावा लागला. शेवटी पोलिसांनी भाऊ आणि बहिणीमध्ये तोडगा काढला आणि महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरब जंग कॉलनीत एका 95 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मुला आणि मुलीमध्ये अंतिम संस्कार करण्यावरून भांडण सुरू झाले होते. या महिलेचा मुलगा आणि नातू हिंदू आहेत. त्यांना आपल्या आईचे अंतिम संस्कार हिंदू पद्धतीनुसार करायचे होते. त्याच वेळी, 20 वर्षांपूर्वी लग्नानंतर, मुस्लिम धर्म स्विकारलेल्या मुलीला तिच्या आईचे मुस्लीम पद्धतीनुसार करायचे होते. मुलीला तिच्या आईचा मृतदेह दफन करण्याची इच्छा होती. गेल्या 12 वर्षांपासून मी आईची काळजी घेत होती. आईनेही धर्मांतर केले होते, असा दावा मुलीने केला होता. शेवटी कागदपत्रे तपासल्यानंतर पोलीस अंतिम निर्णयावर पोहोचले आणि महिलेचे अंतिम संस्कार करण्यात आले.
मुलीच्या म्हणण्यानुसार, आईनेही इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि इस्लामच्या परंपरेनुसार शेवटी दफन करावे ही तिची शेवटची इच्छा होती. "माझी आई गेल्या 12 वर्षांपासून माझ्यासोबत राहत होती. मी तिची काळजी घेत होत. इतर कोणीही तिची काळजी घेतली नाही. मी नुकतीच 5 लाख रुपये देऊन तिच्यावर शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यावेळीही कोणीही मदतीला आले नाही. माझ्या आईने मला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर त्याला कोणी विचारायला येणार नाही. म्हणूनच अंत्यसंस्कार आपल्या परंपरेनुसारच व्हायला हवा. मात्र याला हिंदू धर्म पाळणाऱ्या महिलेचा मुलगा आणि नातवाने आक्षेप घेतला आणि मोठा वाद झाला.
वाढलेला वाद पाहून दोन्ही गटाचे लोक घराजवळ जमा होऊ लागले. यामुळे पोलिसांना रात्रीच्या वेळी परिसरात फौजफाटा तैनात करावा लागला. मात्र पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या तणावाची चर्चा साफ फेटाळून लावली. हा कौटुंबिक वाद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर रात्री 12 ते 1.30 च्या दरम्यान कुटुंबातील दोन्ही बाजूंशी बोलणी केली आणि 2.30 पर्यंत प्रकरण मिटले.
"मुलीने आम्हाला तिच्या आईने इस्लाम धर्म स्वीकारल्याची कागदपत्रे आणि व्हिडिओ दाखवले होते. 2023 मध्ये त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. आम्ही सर्व गोष्टी तपासून पाहिल्या आणि वरिष्ठांशी सल्लामसलत करून आधी मुलगी आणि नंतर मुलाच्या कुटुंबीयांच्या प्रथेनुसार महिलेला निरोप देण्यात आला. महिलेचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी मुलाच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला," अशी माहिती पोलिसांनी दिली