हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी माजी न्यायमूर्ती म्हणतात...
आता याप्रकरणी काही बोलणे हे घाईचे होईल अशी प्रतिक्रिया टाडा न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी दिली आहे.
हैदराबाद : आता याप्रकरणी काही बोलणे हे घाईचे होईल अशी प्रतिक्रिया टाडा न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी दिली आहे. हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी झी न्यूजकडे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्याचा निंदनीय प्रकार घडला. या आरोपींचे एन्काऊंटर केल्यानंतर देशभरातून पोलिसांचे कौतुक झाले तर अनेकांनी त्यांच्या भूमिकेवर संशय घेतला आहे.
जोपर्यंत या संपूर्ण घटनेची चौकशी होत नाही तोपर्यंत सत्य समोर येणार नाही. एन्काऊंटर खरं होत की खोट होतं हे चौकशीनंतरच कळेल असे प्रमोद कोदे म्हणाले.
आरोपींनी पोलिसांच्या हातातील बंदूक खेचली असे म्हटले जात आहे. तर त्यावेळी नेमके किती पोलीस उपस्थित होते ? त्यांच्याकडे किती बंदुका होत्या. रात्री घटनास्थळी जाऊन क्राइम सीनचे रिक्रिएशन करणे हे पोलिसांच्या शोधावर ठरत असल्याचे ते म्हणाले.
कुटुंबाची प्रतिक्रिया
या एन्काऊंटरवर पीडित तरूणीच्या कुटुंबियांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीडित तरूणीच्या वडिलांनी हैदराबाद पोलिसांचे आभार मानले आहेत. माझ्या मुलीच्या मृत्यूला 10 दिवस झाले. मी हैदराबाद पोलीस आणि सरकारचे खूप आभार मानतो. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल अशी भावनिक प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे.
पोलिसांना सलाम
बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिनं ट्विट करत पोलिसांच्या या कामगिरीला सलाम ठोकला आहे. 'हैदराबाद पोलिसांनी खूपच चांगलं काम केलंय... आम्ही तुम्हाला सलाम करतो' असं सायनानं सोशल मीडियावर म्हटले आहे.
निकम यांची प्रतिक्रिया
पोलिसांनादेखील स्व-रक्षणाचा अधिकार आहे. तशी परिस्थिती तेथे निर्माण झाली होती तर मग पोलिसांनी आरोपीला कंबरेखाली गोळी का मारली नाही? असा प्रश्न ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला. लोकांनी कायद्याने प्रस्थापित केलेली संकल्पना मोडकळील निघाली अशी भावना निर्माण होऊ नये. न्यायालयाकडून निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधीदेखील या सगळ्याला जबाबदार असल्याचे उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय. कायद्याचा दरारा निर्माण होत नाही, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.