देश सुरक्षित हातांमध्ये आहे, याची खात्री बाळगा- नरेंद्र मोदी
आपण सर्वांनी भारतीय सैन्यातील पराक्रमी वीरांना नमन केले पाहिजे.
जयपूर: भारतीय वायूदलाने मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. राजस्थानच्या चुरू येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपण सर्वांनी भारतीय सैन्यातील पराक्रमी वीरांना नमन केले पाहिजे, असे सांगितले. तसेच देश सुरक्षित हातांमध्ये आहे, याचा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो, असेही मोदी यांनी सांगितले. देशापेक्षा मोठे काहीही नसते. त्यामुळे आजच्या दिवशी मी प्रधानसेवक म्हणून देशाची सेवा करणाऱ्या आणि देशाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण वाटा उचलणाऱ्यांना नमन करत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
भारतीय वायुसेनेच्या 'मिराज २०००' या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एअर स्ट्राईक केला. यावेळी मिराज विमानांकडून तब्बल १००० किलो स्फोटके जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर डागण्यात आली. या हल्ल्यात मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा टॉप लीडर मौलाना युसूफ अजहर याच्यासह १५० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.