पेगॅससमुळे मला सावध राहण्याचा सल्ला दिला होता... राहुल गांधी यांचा केंब्रिजमध्ये दावा
Pegasus : इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे देशातील काही राजकीय नेते, विरोधक, पत्रकार यांच्यासह 300 हून अधिक बड्या लोकांवर पाळत ठेवण्यात असल्याचा दावा एका शोधपत्रिकेच्या अहवालातून समोर आला होता
Pegasus Row : दोन वर्षांपूर्वी उजेडात आलेल्या पेगॅसस प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल फोन हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये महत्त्वाचे मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते यांचा समावेश असल्याची माहिती प्रोजेक्ट पेगॅससमधून (Pegasus) समोर आले होते. त्यानंतर आता कॉंग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पेगॅसबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. केंब्रिज (Cambridge) येथील भाषणादरम्यान त्यांनी माझ्या फोनमध्ये पेगॅसस हे हेरगिरीचे सॉफ्टवेअर होते. तसेच भारतातील अनेक नेत्यांच्या फोनमध्ये पेगॅसस होते. अनेक अधिकाऱ्यांनी मला फोनवर बोलताना सावध राहण्याचा सल्ला दिला होता, असा दावा केला होता.
"भारतात लोकशाही धोक्यात आली आहे. भारतातील नेत्यांच्या फोनमध्ये पेगॅसस सॉफ्टवेअर होते. माझ्या फोनमध्येही पेगॅसस होता. माझं बोलणं रेकॉर्ड होत असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी मला फोनवर बोलत असताना काळजी घेण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला होता," असे राहुल गांधी म्हणाले.
"आमच्यावर सतत दबाव आणला जात आहे. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्यावर अनेक खटले दाखल झाले. जे गुन्ह्यामध्ये मोडत नाहीत अशा प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत. आम्ही यातून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत," असेही राहुल गांधी म्हणाले.
टीका करणाऱ्याला धमकावलं जात आहे - राहुल गांधी
"प्रसारमाध्यमे आणि न्यायव्यवस्थेवर पकड मजबूत केली गेली आहे. दलित आणि अल्पसंख्याक, आदिवासींवर हल्ले होत आहेत. कुणी टीका केली तर त्याला धमकावले जाते आहे. मी काश्मीरला जात होतो, तेव्हा सुरक्षारक्षक माझ्याकडे आले. ते म्हणाले की आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही काश्मीरमध्ये फिरू शकत नाही, तुमच्यावर ग्रेनेड फेकले जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. पण मी त्यांना माझ्या पक्षाच्या लोकांशी बोलू द्या असे सांगितले," असे राहुल गांधी म्हणाले.