नवी दिल्ली: राहुल गांधींचे लग्न एखाद्या ब्राह्मण मुलीशी झाले असते तर, उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला असता, असे वक्तव्य तेलुगू देसम पक्षाचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी हे विधान केले होते. त्यांनी म्हटले की, मी काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींना एक सल्ला दिला होता. राहुल यांना ब्राह्मण समुदायाच्या पाठिंब्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात तर ब्राह्मण समुदायाचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे राहुल यांचे लग्न एखाद्या चांगल्या ब्राह्मण मुलीशी करुन द्यावे, असा सल्ला मी सोनियाजींना दिला होता. मात्र, त्यांनी माझ्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले, असे रेड्डी यांनी म्हटले. दिवाकर रेड्डी हे अनंतपूर मतदारसंघातून सहाव्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, २०१४ साली त्यांनी तेलुगू देसम पक्षामध्ये प्रवेश केला होता. 


रेड्डी यांनी आपल्या या सल्ल्यामागील भूमिकाही स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, देशाच्या पंतप्रधानपदाचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे पंतप्रधानपदाची मनिषा असलेल्या व्यक्तीला उत्तर प्रदेशात जनाधार असणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच २०१४ मध्ये मी काँग्रेसच्या तिकीटावर लढलो असतो तर माझे डिपॉझिट जप्त झाले असते, असेही रेड्डींना यावेळी बोलून दाखवले.