मोदींच्या दरबारी तब्बल २९ चकरा, पदरी निराशाच
लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच एनडीएतील घटक पक्ष नाराज झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच एनडीएतील घटक पक्ष नाराज झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
उघडपणे व्यक्त केली नाराजी
नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेशला योग्य निधी न दिल्याने टीडीपीचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज झाले आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
२९ वेळा दिल्लीवारी केली पण...
शनिवारी एका कार्यक्रमात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं की, "आंध्रप्रदेशाला न्याय मिळावा यासाठी आम्ही भाजपसोबत आलो. २९ वेळा दिल्लीला गेलो, सर्वांना भेटलो".
न्याय मिळाला नाही
"इतकचं नाही तर, अंतिम अर्थसंकल्पातही आंध्रप्रदेशला न्याय मिळू शकला नाही. केंद्राकडून न्याय मिळावा यासाठी आंध्रप्रदेशातील ५ कोटी नागरिकांकडून मी मागणी करत आहे. इतर राज्यांना किती निधी मिळाला आणि आंध्र प्रदेशला किती निधी मिळाला, याबाबत चर्चेसाठीही मी तयार आहे. मी पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना न्याय देण्याची मागणी करतो" असेही चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.
चर्चा झाली मात्र...
५ फेब्रुवारी रोजी चंद्राबाबू नायडू आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात चर्चा झाली होती. यानंतर दोन्ही पक्षांत सर्वकाही सुरळीत सुरु असल्याचं बोललं जात होतं. मात्र, चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
एनडीएतील घटकपक्षांची नाराजी
लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना काही दिवसांपूर्वी एनडीएतील दोन घटकपक्षांची नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील शिवसेना आणि तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) या दोन घटकपक्षांची नाराजी व्यक्त केली होती.