नवी दिल्ली: लैंगिक शोषणाचा आरोप असलेले परराष्ट्र खात्याचे माजी राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर आणखी एका अमेरिकास्थित महिला पत्रकाराने गंभीर आरोप केले आहेत. काही वर्षांपूर्वी 'एशियन एज' या वृत्तपत्रात  असताना एम.जे.अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असे तिने म्हटले आहे. यामुळे एम.जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पल्लवी गोगोई असे या महिला पत्रकाराचे नाव असून त्या सध्या अमेरिकेतील नॅशनल पब्लिक रेडिओसाठी अर्थविषयक बातम्यांच्या संपादक म्हणून काम करतात. त्यांनी गुरुवारी 'वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये लिहलेल्या लेखातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. 


'एशियन एज'साठी पत्रकारिता करत असताना जयपूर येथील एका हॉटेलमध्ये एम.जे. अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे गोगोई यांनी म्हटले आहे. मी त्यावेळी २३ वर्षांची होती. एम. जे. अकबर हे त्याकाळी आघाडीचे संपादक होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी आनंदात होते. ते वरिष्ठ पत्रकार असल्याचे नेहमीच दाखवून द्यायचे. ते चुकांवरून अनेकांवर डाफरायचे, शेलक्या शब्दांत आमचा उद्धार करायचे. मात्र, या सगळ्यातून काही शिकायला मिळेल, या आशेने मी हे सर्व सहन करत होते. 


१९९४ साली माझ्यावर 'एशियन एज'च्या संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली. एकदा या पानावरील मजकुरासंदर्भात चर्चा करायला मी त्यांच्या केबिनमध्ये गेले होते. त्यावेळी अकबर यांनी माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली आणि तिथून पळ काढला. माझी सहकारी तुशिता हिला मी हा प्रसंग सांगितला. मात्र, याबद्दल आम्ही कुठेही वाच्यता केली नाही. 


यानंतर एका मासिकाच्या लाँचिंगसाठी आम्ही मुंबईत गेलो असताना त्यांनी मला पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेव्हाही त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापासून बचाव करण्याच्या नादात माझ्या चेहऱ्यावर ओरखडेही उमटले होते. मात्र, मी तेथूनही पळ काढला. यानंतर अकबर यांनी या प्रकाराची वाच्यता केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी मला दिली. 


या प्रसंगानंतर मी अकबर यांच्याशी कमीतकमी संबंध येईल, यादृष्टीने काम करायचा प्रयत्न केला. त्यासाठी मी वार्ताहर म्हणून फिल्डवर जायला लागले. मी एकदा अशाच एका वृत्तांकनासाठी जयपूरमध्ये गेले होते. त्यावेळी अकबर मला कोणतीही कल्पना न देता जयपूरमध्ये आले. त्यांनी मला या बातमीविषयी चर्चा करण्यासाठी हॉटेलवर बोलवून घेतले. हॉटेलच्या खोलीत त्यांनी माझे कपडे अक्षरश: खेचून काढले आणि माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळी मी शरमेने प्रचंड घाबरले होते. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार करू शकले नाही. 


या प्रसंगानंतर एम.जे अकबर यांनी जाणुनबुजून माझी बदली अमेरिकेतील कार्यालयात केली. जेणेकरून याठिकाणी मी एकटी पडेन आणि येथे आल्यानंतर माझ्यासोबत हवे ते करता येईल, असा अकबर यांचा उद्देश होता. मी एकदा कार्यालयातील पुरुष सहकाऱ्याशी बोलत असताना त्यांनी मला बघितले. यानंतर ते माझ्यावर प्रचंड चिडले. त्यांनी मला मारहाण केली. काही दिवसांतच त्यांनी मला भारतात परत येण्यास सांगितले. 


अखेर हा ताण असह्य झाल्याने मी कुटुंबीयांशी चर्चा करून 'एशियन एज'ची नोकरी सोडली. यानंतर मला डाऊ जोन्स येथे नोकरी मिळाली. सध्या मी अमेरिकेत स्थायिक आहे. काही दिवसांपूर्वी महिला पत्रकारांच्या आरोपानंतर एम.जे. अकबर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हा मी माझ्या पतीशी चर्चा करून माझ्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला, असे पल्लवी गोगोई यांनी सांगितले. 


दरम्यान, यासंदर्भात एम.जे. अकबर यांच्या वकिलांशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप निराधार आणि खोटे असल्याचे सांगितले.