`मिराज २०००` या सुपरसॉनिक विमानाची वैशिष्ट्ये जाणून घ्या...
मिराज २००० या सुपरसॉनिक विमानाचा वेग ध्वनीच्या अडीच पटीनं जास्त आहे
मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले. मंगळवारी सकाळी, भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी मोठी कारवाई करत नियंत्रण रेषा ओलांडल्याची माहिती भारतीय वायुदलाच्या सूत्रांकडून मिळालीय. भारताकडून नियंत्रण रेषा ओलांडल्याचं पाकिस्तानी सैन्य दलाचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनीही ट्विट करत या वृत्ताला एकप्रकारे दुजोराच दिलाय. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिराज '२०००' या लढाऊ विमानांनी पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून सीमारेषेपलिकडील दहशतवादी तळांचा नायनाट केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. वृत्तसंस्था 'एएनआय'नं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १००० किलो स्फोटकांचा (payload) वापर या हल्ल्यात करण्यात आलं. बालकोटमधल्या 'जैश ए मोहम्मद'च्या तळांवर केलेला हा हल्ला पाकिस्तानचा गाफील ठेवू करण्यात आल्याचं समजतंय. वॉर मेमोरियलच्या सरावाच्या निमित्ताने या विमानांनी उड्डाण केल्याची माहिती समोर येत आहे.
भारतीय वायुदलाच्या 'मिराज २०००' या १२ लढाऊ विमानांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. उल्लेखनीय म्हणजे, कारगिल युद्धातही शत्रुला धडा शिकवण्यासाठी मिराज या विमानांचा वापर करण्यात आला होता. अशा कारवायांसाठी मिराज विमानांचा वापर का केला जातो? या विमानाची वैशिष्ट्ये काय आहेत, यावर एक नजर टाकुयात..
मिराज २००० ची वैशिष्ट्ये...
- मिराज हे फ्रान्सच्या Dassault Aviation कंपनीने बनवलेलं लढाऊ विमान
- मिराज - एफ १ आणि मिराज - ३ ही विमानं जुनी झाल्यानंतर फ्रान्सनं मिराज २००० या विमानांची रचना केली
- मिराज २००० या सुपरसॉनिक विमानाचा वेग ध्वनीच्या अडीच पटीनं जास्त आहे. ताशी कमाल २३३८ किमीचा पल्ला हे विमान गाठू शकतं... एका मिनिटात हे विमान ५६,००० फूट उंची गाठू शकतं
- मिराज २००० एका दमात सुमारे दीड हजार किमी अंतर गाठू शकतं
- मिराज २००० हे 'मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट' अत्याधुनिक आणि लढाऊ विमान म्हणून ओळखलं जातं
- हवेतून जमिनीवर मारा करत 'लुक डाऊन, शूट डाऊन' तसेच हवेतल्या हवेत शत्रूवर हल्ला करणं हे या विमानाचं आणखी एक वैशिष्ट्यं
- हे संपूर्ण विमान डिजिटाईज्ड आहे
- या विमानात त्रिकोणी आकाराचं मुख्य पंख (डेल्टा विंग्ज) आहेत परंतु, त्याला मागच्याबाजुला पंख (टेल विंग्ज) नाहीत
- 'डॉप्लर रडार'च्या सहाय्यानं एकाच वेळी जवळपास २४ निशाण्यांचा भेद हे विमान करू शकतं
- १९८५ भारतीय वायू दलाच्या ताफ्यात दाखल
- मिराज २००० असं मिराजची आवृत्ती भारतीय वायूदलात दाखल
- कारगिल युद्धात लढाऊ विमान मिराज २००० ची अप्रतिम कामगिरी
- देश अणवस्त्र सज्ज झाल्यावर गरज पडल्यास अणुबॉम्ब वाहून नेऊन हल्ला करण्याची जवाबदारी मिराज २००० च्या एका ताफ्यावर सोपवण्यात आली आहे
- एका वेळी हे विमान ६३०० किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकतं
- 'लेझर गायडेड बॉम्ब'चा मारा करण्याची विशेष क्षमता मिराज २००० मध्ये
- भारतीय वायू दालच्या ताफ्यात एक अग्रगण्य आणि विशेष कामगिरी करण्याची क्षमता असलेले लढाऊ विमान म्हणून मिराज २००० ची ओळख