इराणमधील ५८ भारतीयांना घेऊन हवाईदलाचे सी-१७ भारतात दाखल
इराणमधील भारतीयांना घेऊन हवाईदलाचे सी-१७ भारतात दाखल
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे (Indian Air Force ) लष्करी विमान - C-17 ग्लोबमास्टर (Globemaster) या विमानाने कोरोनाव्हायरस ग्रस्त इराणमधून पहिल्या फेरीत तब्बल ५८ भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. इराणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर दोनशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे करोनाच्या भीतीने त्रस्त असणाऱ्या भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री भारतीय हवाईदलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानानं रात्री ८.३० मिनिटांनी इराणच्या तेहरानसाठी उड्डाण घेतले होते. त्यानंतर ५८ भारतीयांना घेऊन विमान गाझियाबादच्या हिंडन एअरफोर्स स्टेशनवर उतरले आहे. या विमानात सर्व पद्धतीच्या मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. देशात परतल्यानंतर या भारतीय नागरिकांना हिंडनमध्येच ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, इराणमध्ये तब्बल २००० भारतीय अडकले आहेत. इराणमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे २३७ जणांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत जवळपास ७१६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले आहे.