नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे असणाऱ्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. ज्यानंतर पाकिस्तानच्या वायुदलाने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत सीमेनजीक असणाऱ्या लष्करांच्या चौक्यांवर निशाणा साधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानची ही घुसखोरी परतवून लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावली ती म्हणजे भारतीय वायुदलाने. या कारवाईदरम्यान वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या नावाची बरीच चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानची ही घुसखोरी रोखण्यासाठी भारताकडून वायुदलाची मदत घेण्यात आली. ज्यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हवाई दलाच्या तळावर अतिशय सतर्क राहत अद्वितीय कामगिरी करणाऱ्या आणि लढाऊ विमानांच्या ताफ्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणाऱ्या या महिला अधिकाऱ्याचा "distinguished service medal" अर्थात 'विशेष सेवा पदक' देऊन गौरव करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


सूत्रांचा हवाला देत 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पंजाबस्थित हवाई दलाच्या तळावर 'या' महिला अधिकारी 'फायटर कंट्रोलर' या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी अतिशय तणावाच्या परिस्थितीत सातत्याने भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांना वेळोवेळी सतर्क केलं. ज्यामुळे पाकिस्तानच्या एफ- १६, जेएफ- १७ आणि मिराज ५ अशा जवळपास २४ विमानांचा ताफा परतवणं शक्य झालं. पाकिस्तानकडून भारताच्या एअर स्ट्राईकचं उत्तर दिलं जाणार हे अपेक्षित होतं. पण, बालाकोट हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानकडून ही कारवाई करण्यात येईल हे मात्र काहीसं अनपेक्षित होतं. 


असे मिळाले पाकिस्तानकडून घुसखोरीच्या प्रयत्नांचे संकेत... 


'टीओआय'च्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील हवाई तळ हे सर्वसामान्य उड्डाणांसाठी २६ फेबुवारीच्या दिवशी सकाळी जवळपास ८ वाजून ४५ मिनिटांनी बंद करण्यात आले, तेव्हाच या घटनेची कुणकुण लागली. भारतीय वायुदलाला  ग्राऊंड स्टाफकडूनही याविषयीचे अनेक धागेदोरे मिळाले होते. त्यानंतर, ९ वाजून ४५ मिनिटांनी ही बाब अधिक स्पष्ट झाली की, नियंत्रण रेषेकडे पाकिस्तानकडून जम्मू- काश्मीरच्या दिशेने लढाऊ विमानांचं उड्डाण सुरू आहे. 


भारतीय वायुदलाच्या विमानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला


पाकिस्तानच्या जवळपास तीन ते चार लढाऊ विमानांनी राजौरीतील कलाल येथील हवाई हद्द ओलांडली. ज्यानंतर भारतीय वायुदलाच्या रडार कंट्रोल हबकडून सुखोई- 30MKI`s आणि मिराज २००० ला उत्तर आणि दक्षिण पिर पंजाल भागात सतर्क राहण्यास सांगण्यात आलं. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांची वाढती संख्या पाहता त्याचवेळी नजीकच्याच श्रीनगर हवाई तळावरुन सहा मिग-२१च्या ताफ्याला बोलवण्यात आलं. भारतीय वायुदलातील लढाऊ विमानांची ही योजना अंमलात आणतेवेळी या साऱ्या प्रक्रियेत 'त्या' महिला अधिकाऱ्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती.


IAFच्या मिगचा अचानक झालेला सहभगा हा पाकिस्तानसाठी अनपेक्षित होता. त्याचवेळी त्या महिला अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या ताफ्यात एफ-१६ असून त्यात १२० सी हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या मिसाईल असल्याची अतिशय महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली, असंही सूत्रांकडून कळत आहे. 


संबंधित महिला अधिकाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून, सध्या त्यांच्या या कामगिरीविषयी ऐकून अनेकांनाच अभिमान वाटत आहे. मुख्य म्हणजे शेजारी राष्ट्राकडून करण्यात आलेली कारवाई परतवून लावण्यात त्यांचाही मोलाचाच सहभाग आहे, हे आता स्पष्ट होत आहे.