नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने सोमवारी एफ-१६ विमान पाडल्याचे ठोस पुरावे सादर केल्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी आदळला आहे. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर २७ फेब्रुवारीला नौशेरा सेक्टरमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या बायसन मिग-२१ विमानाने पाकचे एफ-१६ विमान पाडले होते. हे पुरावे पाकिस्तान नाकारूच शकणार नाही, असे एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी म्हटले. या पुराव्यांवरून पाकिस्तानने केवळ एफ-१६ विमान वापरले एवढेच सिद्ध होत नाही. तर भारताच्या मिग-२१ बायसन विमानानेच एफ-१६ चा वेध घेतला हेदेखील स्पष्ट होत आहे. यावेळी त्यांनी चकमकीदरम्यानच्या रडार इमेजही प्रसिद्ध केल्या. त्या दिवशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानने आपले एक एफ-१६ विमान गमावले. हे सिद्ध करणारे अनेक सबळ पुरावे आमच्याकडे आहे. मात्र सुरक्षा आणि गोपनीयतेच्या प्रश्नामुळे आम्ही ही माहिती सार्वजनिक केली नाही, असेही अर व्हाइस मार्शल आरजीके कपूर यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी एका अमेरिकास्थित एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या सर्व एफ-१६ विमानांची मोजणी झाल्याचा दावा करण्यात आला होता. तेव्हा पाकिस्तानच्या ताफ्यातील एफ-१६ विमानांची संख्या जैसे थे असल्याचे या मासिकाने म्हटले होते. मात्र, भारताकडून या दाव्याचे तात्काळ खंडन करण्यात आले होते. 





२७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या विमानांच्या तुकडीने भारतीय हद्दीत प्रवेश केला. यामध्ये एफ-१६, जेएफ-१७ आणि मिराज ३, मिराज ५ या विमानांचा समावेश होता. ही विमाने भारतीय हद्दीत घुसल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच भारतीय वायूदलाला कळवण्यात आले. त्यानुसार भारताच्या सुखोई ३० एमकेआय, मिराज-२००० आणि मिग-२१ या विमानांनी पाकिस्तानच्या विमानांवर प्रतिहल्ला केला. भारताच्या या प्रतिहल्ल्याने गांगरलेल्या पाकिस्तानी विमानांनी लगेच पळही काढला. मात्र, अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा पाठलाग केला. पाकव्याप्त नौशेरा सेक्टरमध्ये असताना मिग-२१ विमानातून डागण्यात आलेल्या आर७३ आर्चर या क्षेपणास्त्राने एफ-१६ विमानाचा वेध घेतला होता. त्यावेळी उत्तर दिशेला पाकचे एक जेएफ१७ विमानही होते. यावेळी AWACS प्रणालीने काही मिनिटांच्या फरकाने टिपलेल्या छायाचित्रांमध्येही एफ-१६ विमान नसल्याचेही भारतीय वायूदलाने सांगितले होते.