नवी दिल्ली: बहुचर्चित आणि अत्याधुनिक अशा राफेल विमानांसाठी भारतीय वायूदलाची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. येत्या २० सप्टेंबरला फ्रान्सकडून भारताला पहिले राफेल विमान मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत राफेल विमान दाखल झाल्याने भारतीय वायूदलाची ताकद वाढणार आहे. फ्रान्सशी झालेल्या करारानुसार हे भारताला मिळणारे पहिले राफेल विमान असेल. 


२० सप्टेंबरला हे विमान भारताच्या ताब्यात मिळेल. हे विमान घेण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाईदलप्रमुख बी.एस. धानोआ स्वत: फ्रान्सला जाणार आहेत. 


 'राफेल असतं तर, आपलं विमान पडलं नसतं, त्यांचं एकही वाचलं नसतं'


राफेल विमान चालवण्यासाठी भारतीय वायदूलातील २४ वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण साधारण मे महिन्यापर्यंत संपेल. यानंतर भारताला मिळालेली राफेल विमाने आकाशात उड्डाण करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, वायूदलाच्या अंबाला आणि हाशिमारा या तळांवर राफेल विमानांचा प्रत्येकी एक स्क्वाड्रन तैनात करण्यात येईल. 


सप्टेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने फ्रान्सशी ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी तब्बल ७.८७ युरो डॉलर्सचा करार केला होता. मात्र, या विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारविरोधात रान उठवले होते.