'राफेल असतं तर, आपलं विमान पडलं नसतं, त्यांचं एकही वाचलं नसतं'

दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला.

Updated: Mar 4, 2019, 04:49 PM IST
'राफेल असतं तर, आपलं विमान पडलं नसतं, त्यांचं एकही वाचलं नसतं' title=

जामनगर : दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला. 'सेना सांगत असेल तर तुम्ही यावर विश्वास ठेवत नाही का? आपल्याला आपल्या सेनेबद्दल अभिमान असला पाहिजे. दहशतवादाचा अंत केला पाहिजे यावर देश सहमत आहे. भारतीय वायुसेनेकडे आज राफेल विमान असतं तर परिणाम वेगळे असते. पण जर काही लोकांना समजूनच घ्यायचं नसेल, तर मी काही करु शकत नाही', असं मोदी म्हणाले.

'जर राफेल विमान वेळेत मिळालं असतं, तर स्थिती वेगळी असती. जर आमच्याकडे राफेल असतं, तर आमचं एकही विमान पडलं नसतं आणि त्यांचं एकही विमान वाचलं नसतं. दहशतवादाचं मूळ हा आपल्या बाजूचा देश आहे. या आजाराला मुळासकट बरं केलं पाहिजे. जर भारताच्या नाशाचा हेतू ठेवणारा बाहेर असेल, तर भारत शांत बसणार नाही,' असा इशारा मोदींनी दिला.

'गुजरात पाणीदार बनलं'

जामनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक विकास योजनांचं भूमिपूजन केलं. यावेळी बोलताना गुजरात आता पाणीदार राज्य झाल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली. ४० वर्षांपूर्वी जर सरदार सरोवर डॅमचं काम पूर्ण झालं असतं, तर गुजरातला पाण्याची समस्या भेडसावली नसती. गुजरात सोडल्यानंतरही मी सिंचन योजनेबद्दल चिंतित होतो. नर्मदेचं पाणी फक्त पाणीच नाही तर पारस आहे, असं वक्तव्य मोदींनी केलं.

'मी जे करतो ते मोठं करतो'

'मी जे करतो, ते मोठं करतो. आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांतीचं मोठं काम सुरु झालं आहे. मला छोटं आवडत नाही. आयुष्यमान भारत जगातली सगळ्यात मोठी योजना आहे. आयुष्यमान योजना आणि मुख्यमंत्री अमृतम योजनेमुळे जनकल्याण झालं आहे', असं मोदींनी सांगितलं.

गांधीजींनी १०० वर्ष आधी स्वच्छतेचं स्वप्न बघितलं होतं. १०० वर्षात जे कोणीही केलं नाही, ते आम्ही करून दाखवलं. कुंभ मेळ्यामधली स्वच्छता लोकांना आवडली. देशभरात रेल्वेच्या कामाला वेग आला आहे. सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र आहे. आम्ही मच्छीमारांसाठी वेगळं मंत्रालय बनवलं. तसंच २०२२ पर्यंत प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नाचं घर मिळेल, असं मोदी म्हणाले.

जेव्हा मोदी कोचीनला कराची म्हणतात...

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोचीनचा उल्लेख कराची असा केला. पण ही चूक मोदींच्या लगेच लक्षात आली. काय करू हल्ली डोक्यात एकच गोष्ट आहे, अशी हलकी फुलकी प्रतिक्रिया दिली.