मुंबई : भारतीय वायुदलाच्या सेवेत रुजू असणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या ५१व्या स्क्वाड्रनचा गौरव करण्यात करण्यात येणार आहे.  २७ फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरच्या हवाई हद्दीत जात पाकिस्तानच्या एफ- १६वर निशाणा साधण्याची कामगिरी केल्याप्रकरणी त्यांच्या स्क्वाड्रनचा वायुदलाकडून विशेष गौरव करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्क्वाड्रनच्या वतीने कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हे हा पुरस्कार स्वीकारतील. शिवाय २६ फेब्रुवारीला झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईकदरम्यानच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये वापरण्यात आलेल्या मिराज २००० च्या स्क्वाड्रन ९लाही सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय येत्या वायुदल दिनाच्या निमित्ताने मिराजच्या सामर्थ्याची झलकही पाहण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. 


याशिवाय ६०१ सिग्नल युनिटच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनाही बालाकोट एअर स्ट्राईक आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला परतवून लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावण्यात योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. 



पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुदलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात अत्यंत महत्त्वाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाई सीमेपलीकडे असणाऱे दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले होते. ज्यानंतर भारताच्या एअर स्ट्राईकचं उत्तर देण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.