IAS अधिकाऱ्याने मंदिरात जाण्याआधी आपल्या कर्मचाऱ्याला उचलायला लावले बूट, Viral Video वरुन वाद
Viral Video: तामिळनाडूमधील (Tamil Nadu) एका अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला मंदिराबाहेरील आपले शूज उचलण्यास सांगताना दिसत आहे. यानंतर अधिकाऱ्यावर जोरदार टीका होत आहे.
Viral Video: सोशल मीडियावर तामिळनाडूमधील (Tamil Nadu) एका अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत जिल्हाधिकारी मंदिरात जाण्याआधी आपल्या कर्मचाऱ्याला आपले शूज उचलण्यास सांगत असल्याचं दिसत आहे. कल्लाकुरुची (Kallakurichi) येथे हा प्रकार घडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचं सांगत आरोप फेटाळून लावला आहे.
कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी सरवन कुमार जटावथ (Sravan Kumar Jatavath) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये ते आपल्या कर्मचाऱ्याला मंदिरात प्रवेश करण्याआधी शूज उचलण्यास सांगत आहेत. या घटनेनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. हा त्या कर्मचाऱ्याचा अपमान असून त्यांच्या अधिकारांचं हनन आहे अशी टीका केली जात आहे.
सरवन कुमार जटावथ हे कुवागम महोत्सवाचा आढावा घेण्यासाठी कल्लाकुरुची येथील कुवागम कूथान्दावर मंदिरात पोहोचले होते. संपूर्ण जगभरात हा कुवागम महोत्सव प्रसिद्ध असून जिल्हाधिकारी सुरक्षेसह तयारीची पाहणी करत होते. संपूर्ण देशभरात आणि इतर ठिकाणी तृतीयपंथीय हा कुवागम महोत्सव साजरा करत असतात.
तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मंदिरात जात असताना आपले शूज काढतात. यानंतर ते आपल्या कर्मचाऱ्याला बोलावून त्याला ते शूज उचलून घेऊन जाण्यास सांगतात. यानंतर जिल्हाधिकारी पुढे जातात आणि कर्मचारी शूज घेऊन माघारी फिरताना दिसत आहे.
सरवन कुमार जटावथ यांनी पीटीआयशी बोलताना मात्र आरोप फेटाळले आहेत. "मी माझे शूज उचलण्यास सांगितलं नव्हतं. खरं हा व्हिडीओ बनावट असून, चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांना हे खरं नाही याची माहिती आहे. तिथे असणाऱ्या कोणीतरी हा व्हिडीओ एडिट केला असून चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आला आहे".