झारखंडः झारखंडच्या खाण व उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्याशी संबंधित ठिकाणांवरील संपत्तीची अद्यापही मोजदाद सुरूच आहे. ईडीने बिहार आणि झारखंडमध्ये मोठी कारवाई केली आहे.
पूजा आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या अनेक ठिकाणांवर एकाच वेळी हे छापे टाकले. इतकंच नाही तर छाप्यादरम्यान पूजा सिंघल यांचे पती आणि व्यावसायिक अभिषेक झा यांच्या चार्टर्ड अकाउंटंटकडून तब्बल 19 कोटी 31 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसंच विविध ठिकाणांहून 150 कोटींहून अधिक गुंतवणुकीची कागदपत्रेही सापडली आहेत. शुक्रवारी पहाटे सुरू झालेली ईडीची ही कारवाई अद्यापही सुरूच आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक झा यांचे चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांच्या सोनाली अपार्टमेंटमधून तब्बल 19.31 कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. ही रक्कम कशी आली याची माहिती ईडी गोळा करत आहे. त्याचबरोबर ईडीचे अधिकारी गुंतवणुकीची कागदपत्रेही तपासत आहेत. 


शुक्रवारी सकाळी सहा वाजता ईडीच्या पथकाने पाच राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात केली. रांची, मुझफ्फरपूर, कोलकाता, दिल्ली आणि जयपूर येथे हे छापे टाकण्यात आले. ईडीचे सहसंचालक दर्जाचे अधिकारी कपिल राज यांच्या नेतृत्वाखाली रांचीमधील छापे टाकण्यात आले.



ईडीच्या वेगवेगळ्या पथकांनी रांचीमधील पूजा सिंघलच्या अधिकृत निवासस्थानावर तसंच सीए सुमन कुमार यांचं कार्यालय आणि निवासस्थानांवर छापे टाकले आहेत. रांचीशिवाय देशातील अनेक महानगरांमध्ये जमीन, फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मिळतेय. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांच्या मालकीच्या रांची येथील पल्स हॉस्पिटलचीही महत्त्वाची माहिती ईडीला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.