लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन केंद्रावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपलं भाषण संपल्यानंतर 'फ्लाइंग किस' दिल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपाने या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांना घेरलं असून, महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्रच लिहिलं आहे. यादरम्यान एका महिला आयएएस अधिकाऱ्याने या वादावर भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींनी वर्तन अशोभनीय असल्याचं सांगत भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सोपवलं आहे. या पत्रावर सर्व महिला खासदारांनी स्वाक्षरी केली आहे. आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन (IAS Officer Shailbala Martin) यांनी ट्विटरला हे पत्र शेअर केलं आहे. 'मणिपूरच्या महिलांना कसं वाटलं असेल याचाही महिला खासदारांनी विचार करावा,' असं त्यांनी ट्वीट करताना म्हटलं आहे. 




मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन सध्या भोपाळमध्ये मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त सचिव पदावर तैनात आहेत. 


लोकसभेत नेमकं काय झालं होतं?


राहुल गांधी यांनी भाषण संपल्यानंतर भाजपा खासदांकडे पाहून फ्लाइंग किस दिल्याचा आरोप आहे. भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर असभ्य वर्तवणुकीचा आरोप केला आहे. सभागृहात आतापर्यंत कोणीही अशाप्रकारे वागलेलं नाही असा आरोपही त्यांनी केला. 


भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि राहुल गांधींविरोधात कडक कारवाईची मागणी केली. स्वाक्षरी करणाऱ्या सर्व महिला भाजपा खासदार अध्यक्षांच्या दालनात दाखल झाल्या होत्या. 


राहुल गांधी लोकसभेत काय म्हणाले?


"भारत एक आवाज आहे. जर हा आवाज ऐकायचा असेल तर अहंकार, द्वेष संपवायला हवा. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होते. पण पंतप्रधान अद्याप गेलेले नाहीत. त्यांच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूर आता वाचलेलाच नाही. आता त्याचे दोन भाग झाले असून, विभाजन झालं आहे. मी मणिपूरमधील मदत छावणीत महिलांशी, मुलांशी बोललो, जे पंतप्रधानांनी अद्याप केलेलं नाही," अशी टीका राहुल गांधींनी केली. 


"मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. आपण देशद्रोही आहात. तुम्ही देशप्रेमी, देशभक्त अजिबात नाही. म्हणूनच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, तर हत्यारे आहात," असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 


"भारतमाता माझी आई आहे. एक आई इथे बसली आहे आणि दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारलं आहे. जोवर तुम्ही हिंसा बंद करत नाही तोवर तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात. लष्कर एक दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करेल. पण तुम्ही तसं करु इच्छित नाही. जर नरेंद्र मोदी हिंदुस्थानचा आवाज ऐकत नसतील तर कोणाचा आवाज ऐकतात. ते फक्त दोन लोकांचा आवाज ऐकतात," असा आरोप राहुल गांधी यांनी केली. 


राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना रावणाशी केली. राहुल गांधी म्हणाले की, "रावण फक्त दोन कुंभकर्ण आणि मेघनाद यांचं ऐकत होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त अमित शाह आणि अदानी यांचंच ऐकतात. लंकेला हनुमानाने नाही, तर रावणाच्या अहंकाराने जाळलं होतं. प्रभू श्रीरामाने रावणाला मारलं नाही, तर त्याच्या अहंकाराने त्याला मारलं. तुम्ही संपूर्ण देशात केरोसिन फेकत आहात. मणिपूरमध्ये केरोसिन फेकलं आणि काडी ओढली. आता तुम्ही हरियाणातही तेच करत आहात. तुम्ही संपूर्ण देश जाळत आहात".