Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित मानली जाते. देशभरातील लाखो तरुण या परीक्षेसाठी तयारी करत असतात. परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत सहभागी होण्याची त्यांची इच्छा असते. पण अत्यंत कठीण असलेल्या या परीक्षेत मोजक्या जणांनाच यश मिळतं. काही उमेदवारांना पहिल्याच तर अनेकांना अनेक प्रयत्नानंतर यशाची चव चाखण्यास मिळते. नंतर हे यशस्वी उमेदवार भावी पिढीसाठी आदर्श ठरतात. आयएएस अधिकारी सोनल गोयल (IAS Sonal Goel) त्यांच्यातीलच एक आहेत. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून ती व्हायरल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयएएस अधिकारी सोनल गोयल यांना फार संघर्ष केल्यानंतर यश मिळालं होतं. आपला हा संघर्ष त्यांनी आजही लक्षात ठेवला आहे. नुकतंच त्यांनी एक्सवर आपल्या मुख्य परीक्षेची मार्कशीट शेअर केली आहे. यामधून त्यांनी तरुणांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. 


आयएएस अधिकारी सोनल गोयल यांची युपीएससी परीक्षेत 13 वी रँक आली होती. यानंतर त्या प्रशासकीय सेवेत सामील झाल्या होत्या. त्रिपुरात असिस्टंट कलेक्टर पदावर त्यांची पहिल्यांदा पोस्टिंग झाली होती. सध्या त्या त्रिपुरा भवन, दिल्लीत रेसिडंट कमिश्नर पदावर आहेत. 


एक्सवर शेअर केली मार्कशीट


आयएएस अधिकारी सोनल गोयल यांनी एक्सवर आपल्या युपीएससी सिव्हिल सर्व्हिस मेन्स परीक्षा 2007 ची मार्कशीट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपला अपयशापासून ते यशापर्यंतचा प्रवास मांडला आहे. आपल्या संघर्षाच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी 2007 मध्ये आपल्या पहिल्या प्रयत्नात अपयशी झाले होते, पण 2008 मध्ये युपीएससी उत्तीर्ण झाले अशी माहिती दिली आहे. 



पहिल्या प्रयत्नात अपयशी झाल्यानंतरही केले प्रयत्न


सोनल गोयल यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "जेव्हा मी युपीएससी सिव्हिल सर्व्हिस 2007 मेन्स मार्कशीट पाहिली तेव्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या संघर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या ज्यामुळे 2008 मध्ये अंतिम यादीत माझी निवड झाली. पहिल्या प्रयत्नात मेन्स परीक्षेत जनरल स्टडीजमध्ये कमी मार्क मिळाल्याने मी मुलाखतीपर्यंत पोहोचू शकली नव्हती. पण या धक्क्याने युपीएससीचं लक्ष्य मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी कमी न पडण्याचं बळ मिळालं".


पुढे त्यांनी सांगितलं आहे की, "त्यानंतर मी जनरल स्टडीज पेपरमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी नोट्स बनवणे, पुनरावृत्ती आणि उत्तरं लिहिणं यावर भर देणाऱ्या मेनच्या इतर पैलूंमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं. दिल्ली विद्यापीठातून एलएलबी करून आणि सीएस म्हणून अर्धवेळ नोकरी करण्याबरोबरच मी अभ्यासात झोकून दिलं होतं. याचा परिणाम मी फक्त उत्तीर्ण झाले नाही, तर जनरल स्टडीजमध्ये पर्यायी विषयांपेक्षा जास्त गुण मिळाले".


तुम्ही जर कठोर परिश्रम, मेहनत घेतली तर कोणताही अडथळा मोठा नसतो. प्रत्येक धक्का आणि अपयश ही शिकण्याची, सुधारण्याची आणि शेवटी विजयाची संधी असते असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे.