कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सफाई कामगार, डॉक्टर आणि परिचाराकांना १ कोटीची नुकसान भरपाई
सरकारी आणि खासगी दोन्ही सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल.
नवी दिल्ली: कोरोना विषाणूची (COVID-19) लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १ कोटीची नुकसान भरपाई देण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. सफाई सेवेतील कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू होणार आहे. तसेच हे कर्मचारी खासगी किंवा सरकारी सेवेत आहेत, हेदेखील बघितले जाणार नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या सेवेप्रती आदर म्हणून ही रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
कोरोनामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, संशोधकही हैराण
काहीवेळापूर्वीच दिल्लीच्या तीन सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. प्राथमिक माहितीनुसार, सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील बालरुग्ण विभागात असणाऱ्या ३२ वर्षीय डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. मंगळवारी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली होती.
'भारतात अमेरिकेइतकी भयानक परिस्थिती उद्भवणार नाही'
यानंतर सफदरगंज रुग्णालयात कामाला असणाऱ्या त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. मात्र, त्यांची पुन्हा एकदा चाचणी करण्यात येणार आहे. तर कोरोनाची लागण झालेला तिसरा डॉक्टर दिल्लीच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आढळून आला. त्यामुळे आता दिल्लीतील यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.