सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. ते सध्या प्रचाराच्यानिमित्ताने साताऱ्यातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. अशाच कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने मुलांकडून छेडछाडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार उदयनराजे यांच्याकडे केली. त्यावर उदयनराजेंनी त्या विद्यार्थिनीला मुलं मुलींकडे नाहीतर कोणाकडे बघणार?, असा उलट सवाल केला. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी शिट्ट्या वाजवत आणि गलका करत सभागृह डोक्यावर घेतले. मात्र, ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी उदयनराजेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या वादानंतर उदयनराजे भोसले यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यासाठी प्रसारमाध्यमांना जबाबदार धरले. कारण नसताना काही शब्द माझ्या नरड्यात कोंबण्याचा प्रयत्न झाला. हा चारित्र्यहनन करण्याचा प्रकार आहे. माझ्या संवादाचा निवडक भागच सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एखादी व्यक्ती समोरून चालत येत असेल तर आपण तिच्याकडे पाहतोच. मात्र, हे विकृत पद्धतीने होत असेल तर ही गोष्ट वाईट आहे, हेदेखील मी तेव्हाच स्पष्ट केल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. 


उदयनराजे चुकून शरद पवारांच्या गाडीत बसले आणि मग...


काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध युतीकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात अटीतटीची लढत रंगेल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.


खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा राडा