खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा राडा

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. 'फाईट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या बॅनर आणि गाडीची त्यांनी तोडफोड केली.  

Updated: Dec 6, 2018, 04:41 PM IST
खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा राडा

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा धुडगूस घातला. 'फाईट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या बॅनर आणि गाडीची त्यांनी तोडफोड केली. या चित्रपटातील 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या वाक्यावर आक्षेप घेत, उदयनराजे समर्थकांनी ही तोडफोड केली. साताऱ्यातील राधिका पॅलेस या हॉटेलमध्ये फाईट या सिनेमाची पत्रकार परिषद होती, त्यावेळी हा गोंधळ घालण्यात आला.

साताऱ्यात फक्त मीच चालणार' असा एक डायलॉग फाईट या २० डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात आहे. मात्र या डायलॉगवर आक्षेप घेत आज साताऱ्यात फाईट या चित्रपटाच्या प्रेस दरम्यान खासदार उदयनराजे समर्थकांनी चित्रपटाचे बॅनर फाडले आणि दिग्दर्शक जिमी मोरे यांच्या कारची तोडफोड केली. यावेळी साताऱ्यात फक्त उद्यनराजेंच चालतात, असे हे समर्थक सांगत होते.  

हा डायलॉग चित्रपटातून वगळण्यात यावा म्हणून ही तोडफोड केल्याचे देखील उदयनराजे समर्थकांनी सांगितले. या चित्रपटाचा प्रोमो खासदार उदयनराजे पाहतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'साताऱ्यात फक्त मीच चालतो' हा डायलॉग ऐकल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी जोरात हसून डोक्याला हात लावला.