चांद्रयान 3 ला 40 दिवस लागले तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत कसे काय पोहचणार? कोण करणार पहिलं लँडिग
संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियानंही चंद्राकडे यान पाठवलं आहे. दक्षिण ध्रुवावरच रशियन यान उतरणार आहे.
Chandrayaan 3 vs Luna 25: भारताची चांद्रयान 3 मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आली आहे. 14 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत चांद्रयान - 3 चंद्रापासून 100 मीटर अंतरावर पोहचणार आहे. दुरीकडे रशियाचे Luna-25 हे यान हे देखील चंद्र मोहिमेसाठी अवकाशात झेपावले आहे. चांद्रयान 3 की लुना 25 कुणाचे यान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करणार याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चांद्रयान 3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास 40 दिवसांच आहे. तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत चंद्रावर पोहचणार आहे. या दोन्ही मोहिमेमधील फरक जाणून घेऊया.
चांद्रयान 3 चा 40 दिवसांचा प्रदीर्घ प्रवास
14 जुलै 2023 रोजी भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या दिशेने अवकाशात झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35 मिनिटांनी रॉकेट चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं.40 दिवसांच्या प्रवासानंतर 23 ते 24ऑगस्ट दरम्यान चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. चांद्रयान 3 हे थेट चंद्राच्या दिशेने न जाता प्रथम अंडाकृती कक्षेत पृथ्वीभोवती घिरट्या घालत मार्गक्रमण केले. यानंतर चंद्राभोवती अंडाकृती कक्षेत प्रदक्षिणा घालत 14 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत चांद्रयान - 3 चंद्रापासून 100 मीटर अंतरावर असले. इंधनाचा कमीत कमी वापर करता यावा तसेच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत चांद्रयान - 3 स्थिरावे याकरीता प्रत्येक कक्षेत वेग कमी करत हे यान मार्गक्रमण करत आहे. 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होणार आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.
रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत कसे पोहचणार?
भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियानंही आपलं यान चंद्राच्या दिशेनं पाठवले आहे. रशियानं 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच चंद्रावर यान पाठवलंय. रशियाचे Luna-25 हे यान भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता अवकाशात झेपावले. रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला 5550 किमी अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथील अंतराळ केंद्रातून रशिया सोयुझ-2 सर्वात उंच आणइ अत्यंत पावरफुल रॉकेटच्या मदतीने हे यान प्रक्षेपित करण्यात आले. 'लुना-25' हे यान पृथ्वीच्या बाहेर गोलाकार कक्षेत सोडण्यात आले आहे. यामुळे सोयुझ रॉकेटमुळे लुना-25 थेट चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. यामुळे हे यान थेट चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. अवघ्या दहा दिवसांत म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्रावर लँडिग करण्याआधीच लुना 25 पोहचेल असा दावा केला जात आहे. हे यानही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र चंद्रयान-3 आधी हे रशियन यान उतरेल. त्या भागातील चंद्राच्या पृष्ठभागावरील गोठलेल्या बर्फाचा अभ्यास हे यान करेल.