सरकारने परवानगी दिली तर मी शपथविधीसाठी पाकिस्तानात जाईन- कपिल देव
मला शपथविधी सोहळ्याला जायला नक्की आवडेल.
नवी दिल्ली: तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी भारतातून कोण कोण जाणार, याबद्दल गेले काही दिवस चर्चा सुरु आहे. या सोहळ्यासाठी तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावस्कर, नवज्योतसिंग सिद्धू आणि अभिनेता आमिर खान यांना निमंत्रण पाठवल्याची चर्चा आहे. यापैकी नवज्योतसिंग सिद्धू यांनी इम्रान खान यांची प्रशंसा करत आपण शपथविधीला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता आमिर खान या सोहळ्याला जाणार नाही.
यानंतर कपिल देव यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी मला निमंत्रित करण्यात आले आहे का, हे मला माहित नाही. परंतु, मी याबाबत एकदा खातरजमा करुन घेईन. निमंत्रण आले असल्यास मला शपथविधी सोहळ्याला जायला नक्की आवडेल.
मात्र, हे करताना सरकारची परवानगी आवश्यक आहे, असे कपिल देव यांनी सांगितले. येत्या ११ तारखेला हा शपथविधी संपन्न होईल.