CBI Sumns Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याचा (liquor policy case) तपास आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्यापर्यंत पोहोचला आहे. नव्या मद्य धोरणाच्या प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर आता मुख्ममंत्र्यांच्याही अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. सीबीआयने याप्रकरणी आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अरविंद केजरीवाल यांना 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप दारू घोटाळा झाला असल्याचे ओरडत आहे. सर्व कामे सोडून सर्व यंत्रणा तपासात गुंतल्या आहेत. पण तपासात काय आढळले? ईडी आणि सीबीआयचा आरोप आहे की मनीष सिसोदिया यांनी 14 फोन तोडले आहेत, तर ईडीच्या कागदपत्रात 14 फोनचे 3 आयएमईआय नंबर लिहिले आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. "ईडी सीझर मेमोनुसार, 4 फोन ईडीकडे आहेत आणि 1 फोन सीबीआयकडे आहे. उर्वरित 9 फोन कोणी ना कोणी वापरत आहे. ते मनिष सिसोदिया यांचे फोन नाहीत. ईडी आणि सीबीआयने न्यायालयाची दिशाभूल करून न्यायालयात खोटे पुरावे सादर केले आहेत," असाही आरोप केजरीवाल यांनी केला आहे.


पंतप्रधान मोदींचा भ्रष्टाचाराशी काहीही संबंध नाही, कारण खुद्द पंतप्रधानच पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडाले आहेत. अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारी असेल तर देशात आणि जगात कोणीही प्रामाणिक नाही, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. "मद्यविक्री धोरणाच्या तपासात केंद्रीय यंत्रणा आमच्याविरुद्ध न्यायालयात खोटे बोलत आहेत. अटक केलेल्या लोकांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्यावर आमच्यावर कारवाई होण्यासाठी दबाव टाकला जात आहे. सीबीआयने नवीन मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर खोटे आरोप केले आहेत. खोटी कबुली देण्यासाठी लोकांना मारहाण करण्यात आली आहे. तपास यंत्रणा पुराव्यासाठी लोकांचा छळ करत आहेत," असे केजरीवाल म्हणाले.



तर मला अटक करतील - अरविंद केजरीवाल


"मी पुन्हा म्हणेन की केजरीवाल भ्रष्ट असेल तर या देशात प्रामाणिक कोणी नाही. सीबीआयने उद्या मला बोलावले आहे. मी नक्की जाईन. भाजपने सीबीआयला मला अटक करण्याचे आदेश दिले असतील तर ते मला नक्कीच अटक करतील," असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.