नवी दिल्ली : आम्ही सत्तेत आलो तर नीती आयोगच बरखास्त करणार, अशी मोठी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस सत्तेत परतल्यानंतर नीती आयोगाच्या जागी अत्यंत छोटा नियोजन आयोग आणण्यात येईल. या आयोगाचे सदस्य देशाचे मोठे अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते लोक असतील. या आयोगात १०० पेक्षाही कमी लोकांचा भरणा असेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 



न्याय योजनेच्या घोषणेनंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी या योजनेविरोधात मत प्रदर्शित केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर अशा प्रकारची कोणती योजना लागू करण्यात आली तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. राजीव कुमार यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.