नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचा तपशील जगासमोर उघड करून आम्ही जवानांचा जीव धोक्यात घालायचा का, असा सवाल केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी उपस्थित केला. ते शनिवारी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जेटली यांना काँग्रेसकडून एअर स्ट्राईकचे पुरावे देण्याच्या मागणीविषयी विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना जेटली यांनी म्हटले की, जगाच्या इतिहासात आजपर्यंत अमेरिकेने लादेनला मारण्यासाठी सर्वात मोठी कारवाई केली होती. अबोटाबाद येथे जाऊन अमेरिकेच्या सैन्याने लादेनला ठार मारले. यानंतर त्याचा मृतदेह समुद्रात नेऊन फेकला. या कारवाईपूर्वी अमेरिकेने केवळ लादेनची संबंधित परिसरात वावरतानाची छायाचित्रे दिली होती. मात्र, त्यांनी आपण लष्करी मोहीम कशी आखली? त्याचा मृतदेह समुद्रात नेमका कुठे फेकला? याविषयी एकतरी पुरावा दिला का? त्यामुळे काँग्रेस नेत्यांची मागणी ही असमंजसपणा आहे. हे नेते सार्वजनिक जीवनाचा भाग आहेत, हीच गोष्ट खूप दुर्दैवी असल्याचेही जेटली यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील कोणत्या लष्करी कारवाईचा तपशील सार्वजनिक केला जातो? याचा अर्थ आता आम्ही भारताकडे किती जहाजे आहेत, भारतीय वायूदलातील विमाने कुठून उड्डाण करतात, त्यांचे वैमानिक कोण? या विमानांमध्ये कोणती स्फोटके आहेत? हा सर्व तपशील जाहीर करायचा का? काँग्रेस नेत्यांनी याबद्दल माहिती दिल्यास ती सार्वजनिक होईल आणि पाकिस्तानपर्यंतही पोहोचेल, असे जेटली यांनी सांगितले. 


भारतीय सैन्याला दहशतवाद्यांच्या तळाविषयी गुप्त माहिती मिळाली होती. याठिकाणी किती लोक आहेत, हेदेखील त्यांना समजले असेल. या सगळ्याचे पुरावेही त्यांच्याकडे असतील. या ठोस माहितीच्याआधारेच भारतीय वायूदलाने कारवाई करायचे ठरवले. दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केल्यानंतर भारतीय जवानांनी विमानातून खाली उतरून मृतदेह मोजायला पाहिजे होते का, असा सवालही यावेळी जेटली यांनी विचारला.