नवी दिल्ली : रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहनं पार्क करण्यात आल्याचं चित्र तुम्ही अनेकदा पाहीलं असेल. तसेच अनेकदा प्रशासन या वाहन चालकांवर कारवाई का करत नाहीत? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. पण आता अशा वाहनचालकांची माहिती दिल्यास तुम्हाला बक्षीस मिळणार आहे.


गडकरींनी केलं आवाहन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना बेकायदेशीरपणे पार्क करण्यात येणाऱ्या गाड्यांचे फोटोज काढून प्रशासनाला पाठवण्याचं आवाहन केलं आहे.


देण्यात येणार बक्षीस


बेकायदेशीरपणे पार्क करण्यात आलेल्या गाड्यांचे फोटो पाठवणाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.


१० टक्के रक्कम मिळणार


बेकायदेशीरपणे वाहन पार्क करणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यापैकी १० टक्के रक्कम माहिती देणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणार आहे.


नितीन गडकरी यांनी म्हटलं की, अनेकदा मंत्रालयासमोर पार्किंगसाठी जागा नसल्याने राजदूत आणि इतरही प्रतिष्ठित नागरिकांना आपल्या गाड्या संसदेच्या मार्गावरच पार्क कराव्या लागतात. परिणामी संसदेकडे येणाऱ्या मार्गावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लाजिरवाण्या प्रकाराचा सामना करावा लागतो.


आम्ही मोटर वाहन कायद्यात बदल करणार आहोत. जर एखादी गाडी बेकायदेशीरपणे रस्त्यावर पार्क केली असेल तर त्याचा फोटो क्लिक करुन प्रशासन किंवा पोलिसांकडे पाठवावा. त्यानंतर संबंधित वाहनचालकाला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. त्यापैकी १० टक्के रक्कम ही तक्रारदारास देण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.