Viral Video: जंगलात गेल्यानंतर प्राणी पाहिल्यावर अनकेदा पर्यटकांना आपला उत्साह आवरता येत नाही. याच उत्साहात काही पर्यटक प्राण्यांच्या जवळ जाऊन फोटो, व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचे हे प्रयत्न जीवावर बेतण्याची शक्यता असते. आपण आपला जीव धोक्यात घालत आहोत याची कल्पना असतानाही पर्यटक विनाकारण हे धाडस करत असतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली असून, तिचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही ह्रदयाची धडधड वाढेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन अधिकारी प्रवीण कासवान (IFS officer Parveen Kaswan) यांनी एक्स्वर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. या व्हिडीओत हत्ती दोन पर्यटकांचा पाठलाग करताना दिसत आहे. कर्नाटक-केरळ सीमेवरील बंदीपूर जंगल परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर करताना पर्यटकांनी गाडीबाहेर का पडू नये याचं कारण सांगितलं आहे. 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हत्ती दोन व्यक्तींचा पाठलाग करताना दिसत आहे. रहदारीच्या या रस्त्यावर हत्तीला पाहण्यासाठी पर्यटक कारच्या बाहेर आले होते. याचवेळी हत्ती त्यांचा पाठलाग सुरु करतो. हत्ती अचानक मागे धावू लागल्याने दोन्ही पर्यटकही जीव मुठीत घेऊन पळू लागतात. यावेळी कारही त्यांच्या बाजूने पुढे जात असते. वेगाने धावणारा हत्ती रागात असून हार मानण्यास तयार नव्हता. तितक्यात दोघांमधील एक व्यक्ती तोल गेल्याने खाली कोसळते. 



यानंतर हत्ती त्या व्यक्तीला इजा पोहोचवेल असं वाटत होतं. पण त्याच्या सुदैवाने हत्ती त्याला काहीच करत नाही. हत्ती आपल्या पायाने त्याला ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण त्याला पाय लागत नाही आणि जखमी होण्यापासून वाचतो. यानंतर ती व्यक्ती खाली सरपतच बाजूला निघून जाते. पण या घटनेमुळे दोघांना आयुष्यभराचा धडा मिळाला असेल हे मात्र नक्की. 


आयएफएस अधिकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, "ही व्यक्ती फारच नशीबवान ठरली. पण जंगल परिसरात कधीही अशी जोखीम स्विकारु नका. आपल्या गाडीतून बाहेर येऊ नका किंवा जंगली प्राण्यांच्या जवळ जाऊ नका. असं केरळमध्ये सांगितलं जातं".


ही घटना वन्यजीव सुरक्षा प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची आठवण करुन देणारी आहे. दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली असून जंगली प्राण्यांच्या सुरक्षेसाठी जागरुकता करण्याची गरज बोलून दाखवत आहे. तसंच जंगलाच्या सीमांचा आदर केला पाहिजे असंही म्हटलं जात आहे. वन्यजीवांशी संवाद साधण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी वाहने थांबविण्याविरुद्ध वारंवार सल्ले देऊनही, अशा घटना घडतच राहतात, ज्यामुळे मानव आणि प्राणी दोघांनाही धोका निर्माण होतो.