IIT गुवाहाटीचं नवीन संशोधन; नॅनोक्रिस्टल्सच्या सहाय्याने दिसतील शरीरातील घातक टॉक्सिन

IIT गुवाहाटी येथे नवीन नॅनो क्रिस्टल्स विकसित करण्यात आले आहेत. यांच्या सहाय्याने शरीरातील घातक धातूंचा शोध लावता येणार आहे.
IIT Guwahati New Invention: अनेकदा दूषित पाणी, खाद्यपदार्थ, हवा किंवा त्वचेच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या शरीरात बरेच घातक धातू प्रवेश करतात. अशा प्रकारचे आरोग्यासाठी घातक असलेले घटक शरीरात प्रवेश केल्यामुळे अनेक आरोग्यासंबंधी आजार जडण्याची शक्यता असते. शास्त्रज्ञांच्या टीमने धातूपासुन बनललेल्या नॅनो कणांची निर्मिती केली आहे. हे लहान कण अगदी स्थिर असल्यामुळे मानवी पेशींमध्ये असलेल्या पारासारखे विषारी धातू शोधू शकतात. पेशींना काहीही नुकसान न पोहोचता या नॅनो कणांच्या सहाय्याने शरीरातील विषारी घटक शोधता येतात.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे नवीन संशोधन रोगांचा शोध लावण्यासाठी तसेच पर्यावरणातील घातक घटकांना दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. या नॅनो कणांच्या निर्मितीमुळे धातूंचे विषारीपण नियंत्रित ठेवण्यास तसेच त्याचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल. "या पेरोवस्काइट नॅनोक्रिस्टल्सचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अरुंद उत्सर्जन रेषा. ही रेषा घातक धातूंचा शोध लावण्यासाठी हाय सिग्नल-टू-नॉइस या गुणोत्तरामुळे अधिक संवेदनशीलतेला कारणीभूत ठरेल," असे आयआयटी गुवाहाटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक सैकत भौमिक म्हणाले.
आधुनिक इमेजिंग पद्धती
भौमिक यांच्या मते, पारंपारिक इमेजिंग पद्धती या प्रकाशाच्या स्कॅटरमुळे योग्यरित्या काम करु शकत नाहीत. यामुळे, स्पष्ट प्रतिमा कॅप्चर करण्यात बाधा येतात. पेरोवस्काइट नॅनोक्रिस्टल्समध्ये मल्टी-फोटॉन शोषण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे इमेजिंगच्या मर्यादेवर मात करता येते. या नॅनो पार्टिकल्सच्या सहाय्याने अधिक स्पष्ट आणि डिटेल्ड फोटो मिळवता येतो. त्यांचे हे गुणधर्म जैविक आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात फायद्याचे ठरतात.
हे ही वाचा: एका खतरनाक भूकंपानं बदलली पृथ्वीची फिरण्याची दिशा, समुद्रातही विध्वंस
नॅनोक्रिस्टल्सने अगदी कमी पातळीच्या पारामध्ये सुद्धा अचूक संवेदनशीलता दाखवली आहे. याव्यतिरिक्त, जिवंत सस्तन प्राण्यांच्या पेशींवर चाचणी केल्यानंतर नॅनोक्रिस्टल्स हे गैर-विषारी असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पेशींच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होणार नाही तसेच पारा आयर्न्सचे योग्य निरीक्षण करणे शक्य होईल. पारा शोधण्याव्यतिरिक्त, हे नॅनोक्रिस्टल्स जैविक प्रणालींमधील इतर विषारी धातू ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.