नवी दिल्ली : कांद्याच्या वाढत्या दरामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी येतं. तर, कमी वीज पुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना लोडशेडींगचा सामना करावा लागतो. मात्र, आता हाच कांदा तुमच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यास मदत करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआयटी (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) च्या वैज्ञानिकांनी कांद्याच्या सालीपासून वीज निर्मिती करणाऱ्या उपकरणाचा शोध लावला आहे. 


कांद्याची साल आणि शरीराच्या गतीचा वापर करुन ग्रीन एनर्जी (हरित विद्युत निर्मिती) तयार करण्यात येणार आहे. 


पश्चिम बंगालमधील प्रोफेसर भानू भूषण खटुआ यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, हे उपकरण एकदमच स्वस्त आहे. या उपकरणामुळे देशाला नवी दिशा आणि ऊर्जा देण्यास मदत करेल. सर्वसामान्य नागरिकही या उपकरणाचा वापर करत कुठल्याही परिस्थीतीत ऊर्जा निर्मिती करु शकतात. 


या उपकरणापासून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण निर्माण होणार नाही. केवळ शरीराच्या गतीच्या आधारे ही ग्रीन एनर्जी निर्माण करता येणार आहे.


संशोधकांच्या या टीममध्ये आयआयटीचे सुमंता कुमार करण आणि संदीप मैती यांचा समावेश आहे. या दोघांनाही अपेक्षा आहे की, ही नवी टेक्नोलॉजी लवकरात लवकर व्यावसायिक उपयोगात आणली जावी.