नवी दिल्ली : आज लोकसभेत नॅशनल मेडिकल काऊन्सिल बिल विचारार्थ आल्यानंतर हे बिल संमती साठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात आले आहे. हीच आयएमएची मुख्य मागणी होती. त्यामुळे आज पुकारण्यात आलेला एक दिवसीय संप IMA ने मागे घेतला आहे. 


विधेयकातील तरतुदींना विरोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या म्हणजेच आयएमएच्या देशभरातल्या डॉक्टरांनी आज १२ तासाचा लाक्षणिक संप पुकारला होता. केंद्र सरकार आणत असलेल्या नॅशनल मेडिकल कौन्सिल म्हणजेच एनएमसी विधेयकातील तरतुदींना आयएमएचा विरोध आहे. या विधेयकात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजे एमएमसीच्या ऐवजी नँशनल मेडिकल कमिशन अर्थात एनएमसी अस्तित्वात येणार आहे. याला विरोध म्हणून देशभरातील आपली खाजगी प्रँक्टीस बंद ठेवली होती.


काय आहे विधेयक?


सरकारनं आणलेल्या नव्या विधेयकानुसार होमिओपथी, आयुर्वेद आणि इतर उपचार पद्धतींचा अभ्यास करून पदवी मिळाल्यावर एक छोटा कोर्स करून अॅलोपथीची प्रॅक्टीस करणे शक्य होणार आहे. ही तरतूद अस्तित्वात आल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी भीती इंडियन मेडिकल असोशिएशननं व्यक्त केली आहे. शिवाय या विधेयकामुळे अॅलोपथीच्या डॉक्टरांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकारही संपुष्टात येईल, असंही आयएमएचं म्हणणं आहे.


काय आहे आयएमएची अडचण?


हे विधेयक गरीब विरोधी, लोकहिताला हरताळ फासणारे आणि देशाच्या संघराज्यीय व्यवस्थेला मारक असल्यानं आयएमएनं आज काळा दिवस पाळण्याचा निर्णयही घेतला आहे. संपाअंतर्गत सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत खाजगी डॉक्टर प्रॅक्टीस करणार नाही. पण अत्यावश्यक आरोग्य आणि चिकित्सासेवांवर प्रभाव पडणार नाही, असंही आयएमएनं म्हटलंय.