यंदाचा पाऊस समाधानकारक, पण अल-निनोचा धोका कायम; हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सोमवारी नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पहिलावहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा भारतात समाधानकारक पाऊस पडेल. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर यांनी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, सरासरी पडण्याची शक्यता ९६ टक्के इतकी आहे. तसेच यंदा भारतात मान्सूनचा पाऊस सर्वदूर पडेल, असाही हवामान खात्याचा कयास आहे. जून ते ऑगस्ट या काळात समप्रमाणात पाऊस पडेल, असेही हवामान खात्याने सांगितले. हवामान खात्याच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान खात्याकडून मान्सूनविषयीचा दुसरा अंदाज व्यक्त करण्यात येईल. त्यावेळी देशात किती पाऊस पडेल, याचा आणखी नेमका अंदाज येईल.
भारतातील बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. साधारण साडेचार महिने पडणारा पाऊस शेतीसाठी लागणाऱ्या ७० टक्के पाण्याची गरज पूर्ण करतो. तर मान्सूनवर परिणाम करणारा अल-निनो यंदा तितकासा सक्रिय नसेल. परंतु, उन्हाळ्यानंतर ही परिस्थिती बदलू शकते. या काळात अल-निनो अधिक सक्रिय झाला तर त्याचा परिणाम जून व जुलै महिन्यातील पावसावर होईल. तसे झाल्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची ३२ टक्के शक्यता आहे. त्यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसू शकतो. यापूर्वी २०१४ आणि २०१५ मध्ये अल-निनोमुळे कमी पाऊस पडला होता. तर २०१६ मध्ये देशात समाधानकारक पाऊस झाला होता.