नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतीय हवामान खात्याकडून पाकव्याप्त POK काश्मीरमधील हवामानाचा अंदाज वर्तवला जात आहे. हवामान खात्याच्या या कृतीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, भारताकडून जाणीवपूर्वक हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने POKमधील गिलगिट -बाल्टिस्टानमध्ये निवडणुका घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, पाकिस्तानने भारताचा हा भूभाग बळकावला आहे. त्यामुळे अशा प्रदेशबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयला नाही, असे भारताने म्हटले आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढेच नव्हे तर जम्मू-काश्मीरच्या प्रादेशिक हवामानाच्या अहवालात गिलगिट-बाल्टिस्टानचा समावेश करुन भारताने पाकिस्तानला एकप्रकारचा इशारा दिल्याची चर्चा आहे. मात्र, भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द झाला तेव्हापासूनच गिलगिट-बाल्टिस्टान परिसरातील हवामानाचे अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली होती. परंतु वायव्य भारताच्या हवमानविषयक अहवालामध्ये त्याचा स्वतंत्रपणे उल्लेख केला जात नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गिलगिट-बाल्टिस्टान परिसराचा स्वतंत्रपणे उल्लेख केला जात आहे. 

या बदलांसह हवामान खात्याने नुकताच या परिसरातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये गिलगिट-बाल्टिस्टानमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख परिसरातही ९ मेपर्यंत अशाचप्रकारचे हवामान राहण्याचा अंदाज आहे.


तर दुसरीकडे कोरोनासारख्या संकटाच्या काळातही सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. याशिवाय गेल्या काही दिवसांत काश्मीरमधील दहशतवादी कारवायाही वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हंदवाडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल आशुतोष वर्मा यांना वीरमरण आले होते. तर मंगळवारी भारतीय सुरक्षादलांनी मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आणि हिज्बुलचा मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकूचा खात्मा केला होता