नवी दिल्ली : १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. २३ मार्च रोजी दरवर्षी पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येतो. परंतु भारताने पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन समारंभाचे निमंत्रण स्वीकारले नाही. पाकिस्तान उच्चालयाच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला भारताकडून कोणताही प्रतिनिधी पाठवण्यात येणार नाही. परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवसाच्या पूर्व संध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्याचे म्हटले आहे. इम्रान खान यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. मात्र सरकारकडून अशा दिवसांनिमित्त औपचारिक शुभेच्छा दिल्या जातात. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तानला हा संदेश पाठवल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश दिला. इम्रान खानने ट्विट करत मोदींचा संदेश मिळाल्याचे सांगितले. 'मी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा देतो. उपखंडातील जनतेने दहशतवाद, हिंसाचारमुक्त वातावरणात लोकशाही, शांतता, प्रगती आणि समृद्ध राष्ट्रासाठी मिळून काम करूया' असा शुभेच्छा संदेश पाठवल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या या शुभेच्छा संदेशानंतर इम्रान खान यांनी मोदींच्या संदेशाचे स्वागत केले आहे.



 



भारताकडून शुभेच्छा संदेश दिल्याच्या इम्रान खान यांच्या ट्विटनंतर भारत सरकारकडून हा केवळ परंपरेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा दिवसांनिमित्त औपचारिक संदेश पाठवला जातो. या संदेशात केवळ दहशतवाद संपवण्याविषयी जोर देण्यात आला आहे. अशा दिवशी प्रत्येक देशाला पंतप्रधानांच्यावतीने संदेश पाठविला जातो आणि त्याचाच हा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे. 



ज्या दिवशी पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीगकडून लाहोर मांडण्यात आलेला स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मंजूर केला तो दिवस पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. २३ मार्च १९४० रोजी हा ठराव मंजूर करण्यात आला होता. ज्यानंतर २३ मार्च, १९५६ मध्ये पाकिस्तानने पहिल्या संविधानाचा स्वीकार केला. 


भारत सरकारने पाकिस्तान नॅशनल डे निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. पाकिस्तान उच्चालयाकडून फुटिरतावादी नेत्यांनाही या समारंभाचे निमंत्रण देण्यात आल्यामुळे भारताकडून विरोध करण्यात आला आहे.