डोकलाम मुद्दा पुन्हा तापणार? कडाक्याच्या थंडीत चीनचे 1800 सैनिक तैनात
कडाक्याच्या थंडीत सैन्य उभा करण्याची चीनची ही पहिलीच वेळ आहे.
नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरून काही महिन्यांपूर्वी निर्माण झालेला ताण निवळला असतानाच तो पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण, डोकलाममध्ये ऐन कडाक्याच्या थंडीत चानने तब्बल 1600 ते 1800 सैनिक तैनात केल्याचे वृत्त आहे. कडाक्याच्या थंडीत सैन्य उभा करण्याची चीनची ही पहिलीच वेळ आहे..
चीनच्या हालचालीमुळे भारत सतर्क
सीमावादावरून अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अशा या भूप्रदेशात चीनने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. या परिसरात चीनने दोन लष्करी रेलिपॅड, उत्कृष्ट दर्जाचे पक्के रस्ते आणि लष्करी तंबू उभारले आहेत. त्यामुळे चीनच्या हालचाली पाहून भारतही सतर्क झाला असून, काही झाले तरी, चीनला दक्षिणेकडील रस्त्याचे बांधकाम करू देणार नाही, अशी कडक भूमिका भारताने घेतली आहे.
याही आधी असायचा चीनी सैन्याचा मुक्काम
दरम्यान, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, डोकलाममध्ये यापूर्वीही चीनी सैन्य तळ ठोकून असायचे. चीन आणि भूतान यांच्यात डोकलामवरून वाद सुरू आहे. या वादग्रस्त परिसरात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मिचे सैन्य एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत तळ ठोकून असायचे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
डोकलामवरून भारत-चीन संघर्ष
काही महिन्यांपूर्वीच भारत-चीन यांच्यात डोकलाम मुद्द्यावरून जोरदार संघर्ष सुरू होता. दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते. हा संघर्ष सुमारे 73 दिवस सुरू होता. दोन्ही बाजूंकडून कोणत्याही प्रकारे शस्त्राचा वापर करण्यात आला नव्हात. मात्र, एकमेकांना ताकद दाखवण्याचा प्रकार दोन्ही बाजूंकडून झाला. अखेर 28 ऑगस्टला हा तणाव निवळला होता. पण, चीनने पुन्हा हा मुद्दा तापविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते.
लष्कर प्रमुखांनी आगोदरच दिला होता इशारा
दरम्यान, डोकलाममधील वादग्रस्त भूप्रदेशात चीनकडून शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. तसेच, यापूर्वी भारतीय लष्कराने चीनी सैन्याच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेतला नव्हता. मात्र, चीनी सैन्याने तिथे रस्त्यांचे काम सुरू केल्यावर मात्र, भारतीय लष्कराने त्यावर आक्षेप घेत विरोध केला.