श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. घटनास्थळावरून काही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या भागत आणखी काही दहशतवादी असल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. शाहिद अहमद बाबा आणि अनीयत अहमद जिगर अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. शाहिद राजपोरातील दगबगाम तर अनीयत पुलवामातील अरिहाल भागात राहणारा होता. हे दोनही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीआरपीएफच्या इंटेलिजेंस यूनिटला पुलवामातील त्रुबगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुरूवारी रात्री उशिरा १८२-१८३ बटालियन, ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी या भागात घेराबंदी सुरू केली. सुरक्षादलाकडून केलेल्या घेराबंदीने दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. गुरूवारी रात्री ११.३० च्या सुमारास सुरू झालेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 



सुरक्षादल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत मारलेल्या दहशतवाद्यांकडून एक इंसास रायफल आणि एक पिस्टल जप्त करण्यात आला आहे. मारण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांव्यतिरिक्त आणखी एक दहशतवादी घटनास्थळी होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी सुरक्षादलाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.