भारताचे चीनला जशास तसे उत्तर, सीमारेषेवर वाढविली सैनिक गस्त
चीनकडून डोकलामभागात तणाव वाढविण्यात येत आहे. भारतानेही जशास तसे उत्तर देण्यासाठी अरुणाचल सेक्टरमधील चीनच्या सीमारेषेवर सैनिक तैनात केले आहेत.
किबिटू : चीनकडून डोकलामभागात तणाव वाढविण्यात येत आहे. भारतानेही जशास तसे उत्तर देण्यासाठी अरुणाचल सेक्टरमधील चीनच्या सीमारेषेवर सैनिक तैनात केले आहेत. त्यामुळे डोकलामसारखा संघर्ष पुन्हा घडू नये यासाठी भारताने अरुणाचल प्रदेशमधील चीनला लागून असणाऱ्या तिबेट भागातील सीमेवर अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्यात. याआधी भारतीय सैन्याने चीनचे सैन्य पळवून लावले होते.
भारताने चीनला उत्तर देण्यासाठी दिबांग, दाऊ-दिलाई आणि लोहित खोऱ्यातील डोंगराळ भागात गस्तही वाढवलेय. त्यामुळे चीनला आता सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. चीनकडून सातत्याने खुरापत काढण्यात येत आहे. त्यामुळे भारताकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आल्याची सांगण्यात येत आहे.
गतवर्षी डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. जवळपास ७३ दिवस हा संघर्ष चालला. चीनने वारंवार युद्धाची भाषा करुन धमक्या दिल्या. मात्र, भारताने चीनचा दबाव झुगारला. आणि संयमाने हा विषय हाताळला.
दरम्यान, चीनने पुन्हा सीमेवर सैनिक वाढविल्याने भारतानेही सैनिक गस्त वाढवलेय. डोकलामवरुन दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणावाचे वातावरण दूर झालेले नाही. तिबेटला लागून असणाऱ्या सीमेवर महत्वाच्या भागातील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आपली टेहळणी क्षमता अधिक मजबूत करत आहे.
डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये मागच्या वर्षी १६ जूनला सुरु झालेला संघर्ष २८ ऑगस्टला संपला होता. मात्र, पुन्हा चीनकडून खुरापत काढण्यात आलेय. त्यामुळे भारताकडून सीमेवरील नियमित आढावा घेण्यासाठी हेलिकॉप्टर्सची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. दिबांग, दाऊ-दिलाई आणि लोहित खोऱ्यातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेला रोखण्यासाठी डोंगराळ भागावर गस्त वाढवलेय. त्यामुळे पुढील रणनिती वाढविण्यास भारताला मदत होणार आहे.