वडिलांच्या डोळ्यांदेखत चिमुरड्याला चिरडून स्कूल बस निघून गेली
घटनेनंतर चार दिवसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय
वाराणसी : वाराणसीच्या रोहनिया भागातील एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलीय. स्कूलबस चालकाच्या बेपर्वाईमुळे एका दुर्दैवी वडिलांच्यासमोर त्यांच्या चिमुरड्याला स्कूल बस चिरडून पुढे निघून गेली... आणि ते काहीही करू शकले नाहीत... जेव्हापर्यंत ते आपल्या चिमुरड्यापाशी पोहचले तेव्हापर्यंत सर्व संपलं होतं. धक्कादायक म्हणजे, ज्या स्कूलबसमधून हा चिमुरडा आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर उतरला होता त्याच स्कूलबसखाली चिरडून त्याचा मृत्यू झालाय.
या घटनेनं या मुलाच्या संपुर्ण कुटुंबाला धक्का बसलाय. ही घटना शनिवारी २४ नोव्हेंबर रोजी घडल्याचं सांगण्यात येतंय. घटनेनंतर चार दिवसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
रोहनिया क्षेत्रातील राजा तालाब बीरभानपूर गावात ही घटना घडलीय. चिमुरडा साजिद शाळेतून स्कूलबसनं आपल्या घरी येत होता... बसमधून उतरल्यानंतर आपल्या घरी जाण्यासाठी बससमोरूनच रस्ता ओलांडण्यासाठी धावला... मात्र याच वेळी बस चालक अवधेश पटेलनं गाडी सुरू करून पुढे न्यायला सुरूवात केली. ही बस साजिदला चिरडून पुढे निघाली... यात त्याचा जागीच मृत्यू झाला. साजिद सनराईज स्कूलमध्ये शिकत होता.
धक्कादायक म्हणजे, ही घटना साजिदच्या वडिलांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिली... ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आपल्या छतावर उभे होते... साजिद रस्ता ओलांडत असताना आणि चालकानं गाडी सुरू केल्याचं ते वरतून पाहत होते... काहीतरी विपरीत घडतंय याची चाहूल लागल्याबरोबर त्यांनी चालकाला आवाज देण्याचा प्रयत्न केला... परंतु, त्यांचा आवाज चालकापर्यंत पोहचलाच नाही. यावेळी चालकानं ईअर फोन कानात घातल्याचा आरोप, साजिदच्या वडिलांनी केलाय.
या प्रकरणात शाळा व्यवस्थापन आणि चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. तर आरोपी चालक अद्याप फरार आहे.